
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूरच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 2 वर तिकीट बुकींग सुरू करावे, अशी मागणी सिंधी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
एसटी कर्मचारी आंदोलनामुळे बस बंद होत्या. आता काही प्रमाणात बसेस चालू झाल्या आहेत. मात्र मोठी भाडेवाढ असल्याने एसटीचा प्रवास सामान्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे बरेच लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. करोना महामारीमुळे रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्यांसह पॅसेंजरही हळूहळू सुरू होत आहे. सर्व प्रकारचे निर्बंध उठल्याने प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. रेल्वेवरील प्रवासीवर्गाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत.
मात्र, रेल्वेचे तिकीट बुकींग एकाच बाजूने होते. गाडी दुसर्या प्लॅटफार्मला असल्यास लहान मुले, महिला, आजारी व्यक्ती अथवा वयोवृद्धांना एक नंबरवरून तिकीट काढून दुसर्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जावे लागते. बहुतेक लांब पल्ल्याच्या एक्सपे्रस गाड्या प्लॅटफॉर्म दोनवरच असतात. त्यामुळे प्रवाशांची तिकीट काढून प्लॅटफॉर्म दोनवर जाण्यासाठी धांदल उडते. यात महिला, लहान मुले, वयोवृद्धांना दादरवरून चढ-उतार करावी लागते. त्यामुळे त्यांचे हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म नंबर दोनवर तिकीट बुकींगची व्यवस्था करावी, अशी मागणी सिंधी समाजातील प्रमुखांनी केली आहे.