श्रीरामपुरातील रहाट पाळणे बंद

रासकरनगरला छावणीचे स्वरुप || आज पाळणे सुरू करण्याचा प्रयत्न || पोलीस प्रशासनाची नोटीस
श्रीरामपुरातील रहाट पाळणे बंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुरातील श्रीराम नवमीनिमित्त रासकरनगर याठिकाणी चालू असलेले पाळणे तातडीने बंद करण्यात यावेत अशा प्रकारची पोलीस प्रशासनाने काल मंगळवारी नोटीस बजावून रासकरनगर येथील संपूर्ण पाळणे बंद ठेवण्यात आले आहेत. सदरचे पाळणे कायम बंद रहावे म्हणून रासकरनगरला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मात्र चार दिवसांपासून सुरु असलेले पाळणे अचानक बंद झाल्याने नागरिकांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे भविष्यात श्रीरामपूरच्या यात्रेला पाळणे येणार की नाही याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

येथील श्रीरामनवमी यात्रेनिमित्त रासकरनगर येथील म्हाडा कॉलनी परिसरात लावण्यात आलेले रहाट पाळणे बंद करण्यात येत असल्याची नोटीस पोलीस प्रशासनाने पाळणे चालकांना दिली आहे. त्यामुळे हे पाळणे कालपासून बंद झाले आहेत.

शहरातील रासकरनगर येथे 30 मार्चपासून आनंद मेळावा सुरू असून त्यानिमित्त मोठमोठे यात्रिक पाळणे व इतर यांत्रिक खेळण्या सुरू करण्यात आल्या. या आनंद मेळाव्याचे आयोजकांवर श्रीरामपूर नगरपरिषद प्रशासनाने परवानगी नाकारली असताना विनापरवाना आनंद मेळावा भरविणार्‍यांवर दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच शिर्डी येथे प्रसादालयाच्या जागेत रामनवमी यात्रेनिमित्ताने लावण्यात आलेल्या रहाट पाळणा तुटून झालेल्या अपघातात पाळण्यात बसलेले व बाहेर उभे असलेले बरेच लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.

अशा दुर्घटना या आनंद मेळाव्यात घडू नयेत तसेच तेथे जमलेल्या गर्दीमुळे कोणताही अपघात, वित्तहानी किंवा जिवीतहानी घडू नये म्हणून सदरचा आनंद मेळावा आजपासून जनतेसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मेळाव्याचे आयोजक तसेच रहाट पाळणे व खेळण्यांच्या चालकांनी ते आजपासून आपणहून बंद करावेत, असी सांगण्यात आले आहे.

त्यामुळे रासकरनगर म्हाडा कॉलनी परिसरात लागलेला आनंद मेळावा व त्यातील मोठमोठे यांत्रिक पाळणे, इतर यांत्रिक खेळण्या, खाद्यपदार्थ स्टॉल्स व हातगाडे जनतेसाठी बंद करण्यात आले असून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांनी या आशयाची नोटीस आनंद मेळावा आयोजक व रहाट पाळणे चालकांना दिली आहे.

आमच्याकडे पाळणा चालकांचे व पाळण्याचे फिटनेस सर्टीफिकेट आहेत. काही दाखले आहेत. याबाबत तपासणी करण्यासाठी अधिकारीही बोलावले आहेत. आज पाळणा सुरु करण्याबाबत आमचे प्रयत्न सुुरु असल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले.

वाद-विवाद मिटत पाळणे सुुरु झाल्याची वार्ता पसरताच बाहेरगावहून आलेले पाहुणे, तसेच यात्रेकरुंनी काल गर्दी केली होती. मात्र अचानक पाळणे बंद करण्यात आल्याचे समजताच या मंडळींचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. श्रीरामपूरच्या या श्रीराम नवमी यात्रेला वेगवेगळे वळण लागले जात असून याचे परिणाम उद्या यात्रा बंद होण्याकडेही जावू शकतात असेही अनेकांनी त्यांचे मत व्यक्त केले.

श्रीरामपूर शहरातील श्रीराम नवमी यात्रा म्हणजे श्रीरामपूरचे वैभव होते. मात्र त्याला पालिका प्रशासनामुळे गालबोट लागले जात आहे. खासगी जागेत आम्ही पाळणे सुरु करताना पोलीस प्रशासनाकडून नाहरकत दाखला घेतला होता. तसेच वीज वितरणकडूनही नियमानुसार दाखल घेतला होता. तीन दिवस पाळणे चालले लोकांचा प्रतिसादही होता. मात्र काल अचानक पोलिसांच्या तीन चार गाड्या आल्या. पोलीस प्रशासनाने पाळणे बंद ठेवावेत म्हणून नोटीस बजावली. कारण शिर्डीची दुर्घटना होती. मात्र पालिका प्रशासनने पोलीस प्रशासनावर दबाव टाकून पाळणे बंद करण्यासाठी दबाव टाकला. पालिका प्रशासनानेही पोलीसात तक्रार देवून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाळण्यावाल्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. यामुळे पुढील वर्षापासून ते श्रीरामपूरला येतील का? असा सवालही केला जात आहे. हा कोणाच्या दडपशाही खाली आमच्यावर हा दबाव टाकला जात आहे हे कळत नाही.

- नागेश सावंत

श्रीरामपूर शहरातील श्रीरामनवमीची यात्रा म्हटले की, आमच्यासाठी मोठी संधी आणि आनंद होता, मात्र यावर्षी श्रीरामपूर शहरातील वेगळाच अनुभव पहायला मिळाला. स्थानिक वादविवादामुळे आमच्यासारख्या लहान व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यासह मानसिक त्रासही सहन करावा लागला आहे. शहरातील दोन ठिकाणी इकडे तिकडे करण्यात आमचे कष्ट कोणी पहात नाहीत. स्थानिक वादात आम्ही भरडलो गेला आहोत. आमच्या जीवनात पहिल्यांदा आम्हाला या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कदाचित अशीच परिस्थिती राहिली तर पुढील वर्षापासून श्रीरामपूर शहरात यावे की नाही, याबाबत विचार करावा लागेल.

- पाळणा चालक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com