पॉझिटिव्ह निघालेल्या ‘त्या’ नर्समुळे सर्वत्र खळबळ
सार्वमत

पॉझिटिव्ह निघालेल्या ‘त्या’ नर्समुळे सर्वत्र खळबळ

स्त्राव घेतल्यानंतरही ड्युटीवर असलेली नर्स क्कारंटाईन का नाही ?

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

नगरपालिकेत सेवेत असलेल्या नर्सचे स्त्राव घेतल्यानंतर तिला क्कारंटाईन न करता ती ड्युटीवर आल्यामुळे तिचा अनेक आशा सेविका, नर्सबरोबर संबंध आला आहे. तसेच तिने लहान मुलांना डोस देत असतानाही लहान मुलांशी तिचे संबंध आले आहेत. ती नुकतीच पॉझिटिव्ह निघाल्यामुळे या सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

वॉर्ड नं. 2 मध्ये करोनामुळे एका जणाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्याशी संपर्कात आल्यामुळे या नर्सचे 9 जुलै रोजी स्त्राव घेण्यात आले. स्त्राव घेतल्यानंतर या नर्सचे प्रमुख अथवा रुग्णालयाचे प्रमुख यांनी तिला होम क्कारंटाईन करणे गरजेचे होते. तरीही ती ड्युटीवर हजर झाली. या काळात तिचा रुग्णालयातील नर्स व कर्मचार्‍यांशी संबंध आला. एवढेच नव्हे तर तिने अनेक लहान मुलांना महिन्याचे डोसही दिल्यामुळे तिचे लहान मुलांशीही संबंध आले आहेत. बुधवारी रात्री तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या सर्वांमध्ये खळबळ उडाली आहे.

स्वतःच्या जीवावर उदार होऊन या नर्स, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका करोना काळात काम करत आले आहेत. केवळ आज वैद्यकीय विभागातील गलथान कामामुळे ही घटना घडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

‘त्या’ नर्सचे स्त्राव घेतल्यानंतर त्या नर्सला घरी पाठविणे गरजेचे होते. तिला होम क्कारंटाईन करणे गरजेचे होते. ही सर्व जबाबदारी नगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांची होती. ती कामावर का आली? त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे तिचा अनेकांशी संपर्क आला. याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा करून यातील जे दोषी असतील त्यांच्याविरुध्द नोटीस बजाविण्याबाबत चर्चा करणार आहे.

- डॉ. मोहन शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी

नगर परिषदेत सेवेत असलेल्या ‘त्या’ नर्सचे स्त्राव घेतल्यानंतर त्या नर्सने खासगी रुग्णालयात तपासणी केली होती. त्या तपासणीत तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता, असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले होते. मी त्यांच्या नगरपरिषद विभागातील प्रमुखांना तिला ड्युटीवर येऊ देऊ नये असे बजावले होते. तसेच कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे त्यांच्या प्रमुखांनी तिला बोलावून घेतले असावे. याबाबत चौकशी करणार आहे.

- डॉ. सचिन पर्‍हे, नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com