श्रीरामपुरात : पोलिसांकडून व्यापार्‍यांना नाहक त्रास

श्रीरामपुरात रस्त्यावरुन दुकानाची फोटो काढून धमकाविण्याचा प्रकार
श्रीरामपुरात : पोलिसांकडून व्यापार्‍यांना नाहक त्रास

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊन अथवा कडक निर्बंध लावण्याच्या काळात शहरातील कोणती दुकाने बंद ठेवायची व कोणती सुरु

ठेवायची याबाबतचे प्रशिक्षण पोलिसांना देण्याची वेळ आली आहे. सध्या नियमानुसार व्यापारी आपली दुकाने उघडी ठेवत असतानाही पोलीस रस्त्यावरुन दुकानांचे फोटो काढून व्यावसायिकांना दंड आकारण्याची धमकी देवून त्यांना घाबरविण्याचा प्रकार श्रीरामपुरात सुरु असून संतप्त नागरिकांनी प्रांताधिकार्‍यांकडे तसेच पोलीस उपअधिक्षक यांच्याकडे तक्रार करुन असे प्रकार तातडीने बंद करा. तसेच फोटो काढून व्यापार्‍यांना नाहक त्रास दिला जातो तो थांबविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

श्रीरामपूर येथील काही व्यापार्‍यांनी काल प्रांताधिकारी यांच्याकडे जावून सदरप्रकार सांगितला. हा गंभीर प्रकार असून तो थांबला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

श्रीरामपूर येथे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशान्वये येथील व्यापारी आपली अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियमानुसार उघडली जातात व दिलेल्या वेळेतही बंद केली जातात. तसेच करोनाचे सर्व नियम पाळली जातात. तरीही पोलीस आपली गाडी रस्त्यावर गस्त घालत दुकानांचे फोटो काढून दंड आकारला जाईल म्हणून त्यांना धमकावतात.

आमची काहीच चुक नाही मग आमच्या दुकानाची फोटो काढली जातात. मागील काही जुने उट्टे काढून दुकानदारांवर कारवाईची भाषा बोलली जाते. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये पोलिसांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त व्यापार्‍यांनी प्रांताधिकारी व पोलीस उपअधिक्षक यांच्याकडे धाव घेत निवेदन देत याबाबत तातडीने व्यापार्‍यांना त्रास देण्याचा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com