श्रीरामपूरचे चार पोलीस निलंबित
सार्वमत

श्रीरामपूरचे चार पोलीस निलंबित

आरोपीचे पलायन प्रकरण

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पलायन केले. त्यामुळे कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या चार पोलिसांना पोलीस अधिक्षकांनी निलंबित केले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील सासर्‍याकडून जावयाचा खून, प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्य आरोपी सचिन काळे व बुंदी भोसले यांनी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता बुंदी भोसले याने पोलिसांची नजर चुकवून पोबारा केला.

यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंढरीनाथ घोरपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मन्सूर अहमद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी दत्तात्रय शिंदे हे तिघे त्यांच्या बंदोबस्तासाठी होते. यातील तिघे पोलीस बुंदी भोसलेच्या पाठीमागे धावले. याचा फायदा घेत दुसरा आरोपी सचिन काळे याने पलायन केले. त्यामुळे आपली जबाबदारी धुडकावत कोणताही विचार न करता कामगिरीत चुकारपणा केल्याचा आरोप या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.

तसेच पोलिसांना दवाखान्यात घेवून जात असताना तालुका पोलीस ठाण्यात असलेले ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार भैलुमे यांनी कोणतीही नोंद डायरीला न केल्यामुळे बेजबाबदारपणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी त्यांच्या कामात बेजबाबदार, कामचुकारपणा आरोपीस पळून जाण्याची संधी दिली व कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका या चारही पोलिसांवर ठेवत पोलीस अधिक्षक़ अखिलेशकुमार सिंग यांनी निलंबीत केले आहे. या चारही पोलिसांची प्राथमिक चौकशी सुरु आहे,अशी माहिती पोलीस उपअधिक्षक राहुल मदने यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com