
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आरोपीस अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचा आदेश देऊनही वॉरंटची बजावणी न केल्याने येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए.देशमुख यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे.
भाऊसाहेब दरोडे (रा. नगर) आणि संजय लक्ष्मण गोल्हार (रा. लक्ष्मीवाडी, टाकळीभान, ता. श्रीरामपूर) हे केंद्र शासनाच्या एका विभागात बरोबर नोकरीस होते. दरोडे यांच्याकडून गोल्हार यांनी भावासाठी मेडिकल दुकान टाकण्यासाठी दीड लाख रुपये हातउसने घेतले. ते वेळोवेळी मागणी करूनही परत न देता, त्या रकमेचा धनादेश दिला असता, तो बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नाही. या कारणाने न वटता परत आला.
दरोडे यांनी कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशातील रक्कमेची मागणी केली. परंतु, आरोपीने रक्कम दिली नाही म्हणून निगोशिएबल इंस्टुमेंट अॅक्टचे कलम 138 नुसार फिर्याद दाखल केली. आरोपी गोल्हार यास नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यास अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले. पोलिसांनी या वॉरंटची बजावणी केली नाही. वॉरंटचा कोणताही अहवाल न्यायालयात दाखल केला नाही. त्यामुळे न्यायालयाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. फिर्यादीच्यावतीने अॅड. सुरेश लगड काम पहात आहेत.