श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक नाट्यमय वळणावर

सभापती निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देण्याची बाब कार्यकक्षेत नसल्याने
श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक नाट्यमय वळणावर

ग्रामविकासमंत्र्यांनी संगीता शिंदे यांचा अर्ज फेटाळला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदाची जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती मिळावी म्हणून पंचायत समिती सभापती संगीता शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे अपील केले होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची बाब या न्यायधिकारणाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे नमूद करून ग्रामविकासमंत्र्यांनी सौ. संगीता शिंदे यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेला सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.

पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांनी पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका डॉ. सौ. वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती. ज्यात जिल्हाधिकार्‍यांनी वंदना मुरकुटे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यामुळे सौ. वंदना मुरकुटे यांचा सभापती पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाच्या विरोधात संगिता शिंदे यांना ग्रामविकास मंत्र्यांकडे दाद मागता येवू शकते. असेही जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयात नमूद केले होते.

त्यानुसार सौ. संगिता सुनील शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयास स्थगिती द्यावी अशा आशयाचा अर्ज दाखल केला होता. त्यानुसार काल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीप यांनी निर्णय दिला की, जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देण्याची बाब या न्यायधिकारणाच्या कार्यकक्षेत नसल्याने अर्जदार संगिता शिंदे यांचा श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीस स्थगिती देण्याबाबतचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे. डॉ. वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड. दत्तात्रय घोडके, अ‍ॅड. अजित काळे व अ‍ॅड. समिन बागवान यांनी काम पाहिले.

श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक आज गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी होत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळमर्यादा स.10 ते 12 वाजेपर्यंत राहणार आहे. या उमेदवारी अर्जाची छाननी दु. 2 ते 2.15 वाजता तर उमेदवारी अर्ज माघार दु. 2.15 ते 2.30 यावेळेत राहणार असून सभापतीपदासाठी निवडणूक दु. 2.30 वाजता सुरु होणार आहे.

आज सभापतिपदाची निवडणूक होणार

मात्र निकाल घोषित करता येणार नाही : उच्च न्यायालय

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपद निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया केली जाऊ शकते परंतु सभापतिपदाची निवड (निकाल) घोषित करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचायत समिती सभापती पदाची निवड आज गुरुवार दि.18 रोजी होणार असली तरी तिचा निकाल राखीव ठेवला जाणार आहे.

पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांनी पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका डॉ. सौ. वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती.ज्यात जिल्हाधिकार्‍यांनी वंदना मुरकुटे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यामुळे सौ.वंदना मुरकुटे यांचा सभापती पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आज गुरुवारी सभापती पदाची निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. मात्र माजी सभापती दिपक पटारे यांनी पुन्हा उच्च न्यायालयात सभापती पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात याचिका दाखल केली असून त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी सदर निवडणूक सभा घ्यावी मात्र सभापती पदाची निवड घोषित करू नये असा आदेश दिला आहे. या अर्जावर पुढील सुनावणी सात दिवसांनी म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. सिद्धार्थ ठोंबरे यांनी काम पाहिले तर अ‍ॅड.स्वप्नील काकड यांनी सहकार्य केले.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक वेगळ्या वळणार पोहचली असून डॉ. वंदना मुरकटे यांच्या सभापती होण्याचा मार्ग कधी सुकर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com