श्रीरामपूर पंचायत समितीचा कारभार रामभरोसे

श्रीरामपूर पंचायत समितीचा कारभार रामभरोसे

कोणीच कोणाचे ऐकेना : पदाधिकारीही झाले हतबल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पंचायत समितीत सध्या अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच नसतात. काही अधिकार्‍यांकडे दोन दोन ठिकाणचा कारभार असल्यामुळे आठवड्यातून एक दिवस येवून थातूर मातुर कामे करुन वेळकाढूपणा करतात. कोणत्या विभागात काय चालू आहे याबाबत गटविकास अधिकारी तर अनभिज्ञच असतात. अधिकारी कर्मचारी कोणीच कोणाचे ऐकत नाहीत; त्यामुळे पदाधिकारीही हतबल झाले आहेत. याचा मनस्ताप सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

सध्याचे गटविकास अधिकारी हे काही महिन्यापूर्वीच बदलून येथे आलेले आहेत. त्यामुळे अनेक महिने होवून गेले तरी अद्याप कोणत्या विभागात काय चालू आहे याबाबत ते अनभिज्ञ आहेत. त्याच कालावधीत गटशिक्षणाधिकारीही बदलून आले आहेत. मागील वर्षभरात उपस्थित भत्ता तसेच सावित्रीबाई फुले अशा प्रकारच्या स्कॉलरशिप देण्यात आलेली नाही. त्यामुळे वंचित घटकांना करोनाच्या काळात मदत मिळायला हवी ती मिळाली नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जन्म-मृत्यूच्या नोंदी आठ आठ दिवस होत नाहीत. पढेगाव येथील रुग्णालयाची इमारत बांधून एक वर्ष झाले तरी अद्याप त्याचे उद्घाटन नाही. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. शासनानेही अद्याप आरोग्य विभागाच्या ताब्यात दिलेली नाही. याबाबत येथील अधिकार्‍यांनाकाहीच सांगता येत नाही. याबाबतची माहिती विचारण्यासाठी फोन केला असता फोनही उचलला जात नाही. करोना अद्याप संपलेला नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतानाही श्रीरामपूर पंचायत समितीचे प्रमुख गटविकास अधिकारी असतानाही तालुक्यात किती रुग्ण आहे याची त्यांना माहिती नाही. आता करोना संपलेला आहे असे सांगून ते मोकळे होतात.

घरकुल योजनेतील काही घरे पूर्ण नसतांनाही त्याची बिले काढण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी पूर्वीच घरे बांधलेली आहेत त्याचे अनुदान देण्यात आलेले आहेत. बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडे नगर व श्रीरामपूर या दोन ठिकाणचा कारभारअसल्यामुळे आठवड्यातील पाच दिवस ते नगरला असतात तर केवळ एक दिवस श्रीरामपूरला हजेरी लावत असतात. त्यामुळे त्यांच्या हाताखालील अधिकारी व कर्मचारी मनमानी पध्दतीने काम करत असतात. त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही. बांधकाम विभागाची कामे निकृष्ट पध्दतीने सुरु आहेत. कामे पूर्ण नसतानाही बिले काढण्यात आलेली आहे. रस्त्यांच्या झालेल्या कामाबाबत दयनिय अवस्था पहायला मिळत आहे.

येथील पंचायत समितीतकोणता अधिकारी नाही, त्याचे जागेवर कोण काम पहाणार याबाबतची माहिती नसते. कोण कोणत्या ठिकाणी जातो याची माहिती नसते. अनेकवेळा ऑफिसमध्ये मोजकेच लोक पहायला मिळतात. दिवसभर अनेकजण बाहेरच असतात. याबाबत गटविकास अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनाही काही माहित नसते. पदाधिकार्‍यांनी विचारणा केली असता थातूर मातुर उत्तरे देवून मोकळे होतात मात्र परिस्थिती वेगळी असल्याची बाब लक्षात आणून दिली तरी अधिकारी कर्मचारी पदाधिकार्‍यांचेही ऐकत नाही ही दुर्दैवी बाब असल्याचेही उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी सांगितली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com