श्रीरामपूर : सभापतिपदाचा निकाल राखीव

वंदना मुरकुटे यांचा एकच अर्ज वैध; अन्य दोन अर्ज अवैध
श्रीरामपूर : सभापतिपदाचा निकाल राखीव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया काल न्यायालयाच्या निर्देशानुसार व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. मात्र सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून सदरचा निकाल बुधवार दि. 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत जाहीर करणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी अनिल पवार यांनी दिली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्याबाबतचे अपिल उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली.

पंचायत समितीचे सभापती पद विखे गट व काँग्रेसकडून प्रतिष्ठेचे करण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीला विषेश महत्व प्राप्त झाले होते. दोन्ही गटाकडून निवडणूक प्रक्रियेनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला.

पंचायत समितीच्या सभापती संगिता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आले. यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. हे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वंदना मुरकुटे या पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. शिंदे यांच्या अपात्रतेसाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दि. 9 नोव्हेंबर रोजी या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याला विखे गटाचे माजी सभापती दीपक पटारे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.

पंचायत समितीत 50 टक्क्यापेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याचे आपल्या याचिकेत नमूद केले आहे. याप्रकरणी खंडपीठाने दि. 18 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया घेण्यास मान्यता देत निकाल जाहीर करण्यास मात्र मनाई केली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार, सहाय्यक तथा गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी काँग्रेसच्यावतीने वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्यावतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कल्याणी कानडे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. डी. जोंधळे तर वैशाली मोरे यांच्यावतीने अ‍ॅड. एस. बी. काकड यांच्या मार्फत्त पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला.

सदरचे दोन्ही उमेदवारी अर्ज अन्य प्रवर्गातील उमेदवार असून हे इतर मागास महिला प्रवर्गाचे नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले तर वंदना मुरकुटे या इतर मागास प्रवर्गातून निवडून आल्या असून त्यांनी जातीचे दाखल्यासह सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितले. आरक्षित पदाकरिता एकच सदस्य पात्र असल्याने मतदानाची गरज पडली नाही. न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम घेण्यास मनाई केलेली नसल्याने आजची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करतांना विखे गटाचे माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, जि.प. सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, संदीप शेलार, वैशाली मोरे, कल्याणी कानडे, सभापती संगिता शिंदे रामभाऊ तरस, आदी उपस्थित होते. तर काँग्रेसच्यावतीने इंद्रनाथ थोरात, अशोक कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक कानडे, पंचायत समिती सदस्य अरूण पाटील नाईक, विजय शिंदे, विजय मोरे, अ‍ॅड. समिन बागवान आदी उपस्थित होते.

विरोधकांनी रडीचा डाव खेळला आहे. त्यांच्या प्रतिष्ठेपायी एक महिला अपात्र ठरली. काँग्रेसच्या उमेदवाराला चोरून सभापतीपदावर बसविले. मात्र, लगाम आपल्याच हातात ठेवला. त्यांचे पद गेले आणि आपण ज्यावेळी अर्ज दाखल केला त्यावेळीही त्यांनी सभापती होवू नये म्हणून प्रयत्न केले. ही लोकशाहीची गळचेपी असून सत्याचा पराजय करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न आहे. विरोधी सदस्य हे केवळ कठपुतली असून त्यांचे स्वतःचे अस्तित्वही नाही. त्यांच्या पाठीमागे कोण आहे हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. जर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, मंत्र्यांचा तसेच जिल्हाधिकारी यांचा निर्णय येवून त्यांनी माझ्या स्वप्नांना मंगेरीलाल के स्वप्प म्हणतात याबाबत त्यांची किव येते. माझ्या पाठिशी श्रीकृष्ण आहे बाकीच्यांकडे सैन्य आहे. यात ज्ञानेश्वर मुरकुटे, आ. लहू कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या यशाचे शिल्पकार ठरले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे यांनी दिली.

संगिता शिंदे यांना अपात्र करण्यासाठी राजकीय बळाचा वापर झाला. महिला सभापती म्हणून त्यांचे चांगले काम होते. मंत्रालयात अपिलाची मुदतही संपलेली नसताना निवडणूक लावली गेली. कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांचे अर्ज फेटाळले त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सहकार्याने पंचायत समितीचे कामकाज पाहत आहोत. काँग्रेसने महिला सभापतीला थांबविण्यासाठी मंत्री, राजकीय दबाव आणून ही प्रक्रिया पूर्ण केली ती अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली. दरम्यान, ंजिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील केेले होते. त्यांचा निर्णय येण्या अगोदरच जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणूक प्रक्रियेला माजी सभापती संगिता शिंदे यांनी अर्ज करत आक्षेप नोंदविला. यात या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले असून या निवडीला विरोध असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com