श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपदाची 18 रोजी निवडणूक

एकमेव ओबीसी महिला सदस्य म्हणून डॉ. वंदना मुरकुटे यांची निवड निश्चित
श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपदाची 18 रोजी निवडणूक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केला असून सदरची निवडणूक गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. सभापतिपदावर ओबीसी महिला आरक्षण असल्यामुळे या प्रवर्गातील डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे या एकमेव सदस्य असल्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. केवळ सोपस्कार म्हणून सदरची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

सन 2017 मध्ये चुरशीच्या झालेल्या श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक, विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार अधिकृत सदस्य विजयी झाले. तर विरोधी मुरकुटे-विखे गटाचे दीपक पटारे, बाळासाहेब तोरणे, वैशाली मोरे व कल्याणी कानडे हे चार सदस्य विजयी झाले. पुढे सभापती निवडीच्यावेळी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आठ सदस्यीय असणार्‍या पंचायत समितीमध्ये डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन महिला सदस्यांना संधी प्राप्त झाली. त्यावेळी निवडीच्या आधी तालुक्यात एक नवे राजकीय समीकरण उदयास आले. काँग्रेस पक्षाच्या सभापती पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. वंदना मुरकुटे यांना घोषित केले असताना ऐनवेळी संगीता नाना शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापतीपद मिळवले.

दरम्यान शिंदे यांच्या विरोधात पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका डॉ.वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती. या संदर्भात सभापती शिंदे यांनी वेळोवेळी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय येथे आव्हान दिले होते. मात्र दोन्ही ठिकाणी सभापती शिंदे यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम 1986 मधील कलम 3(1) (ब) मधील तरतुदीनुसार आपात्र घोषित केले आहे. त्यामुळे सदर निवडणुकीसाठी संगिता शिंदे यांच्या व्यतिरीक्त सात सदस्य पात्र राहणार आहेत. यात विखे-मुरकुटे गटाचे चार तर ससाणे गटाचे तीन सदस्य आहेत.

पंचायत समितीत विखे-मुरकुटे गटाचे सदस्य संख्या जास्त असले तरी सभापतीपद हे ओबीसी महिलेकरिता आरक्षीत असल्यामुळे डॉ. वंदना मुरकुटे या एकमेव ओबीसी महिला सदस्य असल्यामुळे जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. केवळ सोपस्कार म्हणून सदरची निवडणूक गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी होत आहे. यात पंचायत समितीच्या सभागृहात होत असलेल्या या पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळमर्यादा सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत राहणार आहे. या उमेदवारी अर्जाची छाननी दुपारी 2 ते 2.15 वाजता तर उमेदवारी अर्ज माघार दुपारी 2.15 ते 2.30 यावेळेत राहणार असून सभापतीपदासाठी निवडणूक दुपारी 2.30 वाजता होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com