श्रीरामपूर पं. स. गटनेतेपद वाद मुरकुटे-शिंदेंकडून युक्तीवाद

29 जून रोजी पुढील सुनावणी
श्रीरामपूर पं. स. गटनेतेपद वाद मुरकुटे-शिंदेंकडून युक्तीवाद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटनेतेपदी निवडीवरून जिल्हाधिकार्‍यांकडे दोन्ही गटाने तक्रार दाखल केली असून काल झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूचे म्हणणे जिल्हाधिकार्‍यांनी ऐकून घेतले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पुढील सुनावणी 29 जून रोजी होणार असल्याचे सांगितले.

श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटनेेतेपदी काँग्रेसच्यावतीने संगीता नानासाहेब शिंदे व डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी दावेदारी केली होती. यावेळी दोन्ही गटाने काँग्रेेस जिल्हाध्यक्ष यांच्याकडून तसे पत्रही आणले होते. काँग्रेसने दोघांनाही पत्र दिल्यामुळे हा वाद रंगला. परंतु यावेळी संगीता शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. या गटनेतेपदाबाबत संगीता शिंदे व वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली. यात जिल्हाधिकार्‍यांनी वंदना मुरकुटे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यावेळी संगीता शिंदे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु उच्च न्यायालयाने सदरचा वाद हा जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात चालवावा, असे सांगितले.

त्यामुळे पुन्हा जिल्हाधिकार्‍यांपुढे हा वाद आल्याने संगिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात वंदना मुरकुटे यांच्या निवडीला स्थगिती मिळावी म्हणून याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात दोनवेळा सुनावणी झाली; परंतु लॉकडाऊनमुळे पुढे ही सुनावणी होऊ शकली नाही. त्यात काल बर्‍याच दिवसानंतर जिल्हाधिकार्‍यांपुढे सुनावणी झाली. काल जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पुढील सुनावणी 29 जून रोजी होणार असल्याचे सांगितले. पुढील सुनावणीत काय होते याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागुन आहे. शिंदे यांच्यावतीने सांगितले की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. तर मुरकुटे यांंनी सांगितले की, काल सुनावणी झाली असून निकाल अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे 29 जून रोजी याबाबत निकालच बाहेर येणार असल्याचे सांगितले.

काल सुनावणीच्यावेळी डॉ. वंदना मुरकुटे यांच्याबरोबर काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, विजय शिंदे तीन सदस्य उपस्थित होते. तर संगिता शिंदे यांच्या बाजुने नाना उर्फ सुनील शिंदे उपस्थित होते. काल मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड. मोरे यांनी तर शिंदे यांच्यावतीने अ‍ॅड. काकड यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com