श्रीरामपूर पालिकेच्या कर्मचार्‍यांना मिळाले विमा संरक्षण

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या आंदोलनाला यश
श्रीरामपूर पालिकेच्या कर्मचार्‍यांना मिळाले विमा संरक्षण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी करोनासारख्या महामारीतही आपले कर्तव्य बजावत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी रात्रंदिवस काम करत असतात. त्यामुळे या सर्व कर्मचार्‍यांना विमा संरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे व काँग्रेसच्या नगरसेवकांनी वारंवार केली होती. त्या मागणीला अखेर यश आले आणि पालिकेच्या कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले.

याप्रश्नी काँग्रेसच्यावतीने अनेक वेळेस निवेदनेही दिली होती. त्यासाठी नगरपालिकेच्या जनरल बोर्डाच्या मिटिंग मध्येही सतत मागणी करण्यात आली होती. पालिकेच्या अर्थसंकल्पात विम्याची तरतूद असूनही केवळ नगराध्यक्षांना कर्मचार्‍यांच्या अडचणींची जाणीव नसल्याने, विम्याचा लाभ मिळत नव्हता. अडचणीच्या परिस्थितीत असणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोणा सारख्या आजाराचा खर्च पेलत नव्हता. त्यामुळे त्यांनी आजार अंगावर काढला.

त्यात 2 कर्मचार्‍यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे उपनगराध्यक्ष करण ससाणे व काँग्रेस नगरसेवकांनी नगरपालिकेच्या गेटवर अर्थसंकल्पाची होळी करून आंदोलन केले होते. त्यामुळे नगरपालिका सत्ताधार्‍यांना जाग आली व कर्मचार्‍यांसाठी विमा संरक्षण द्यावे लागले. परंतु त्यातही हे विमा संरक्षण कोणत्या कर्मचार्‍यांसाठी आहे. जे ठेक्याचे कर्मचारी आहे त्यांना हे संरक्षण आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही. तसेच ज्या कंपनीकडे हा विमा काढला आहे ती कंपनी नवीनच असल्याची माहिती मिळते.

त्यामुळे ही कंपनी किती विश्वासाहार्य आहे याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आत्तापर्यंत या कंपनीचे ग्राहक, त्यांना मिळालेला विम्याचा मोबदला, त्यांची पॉलिसी याबाबत कोणालाच काही माहिती नाही. आपल्याकडे मोठमोठ्या मान्यताप्राप्त विमा कंपन्या असतानाही पालिकेने याच कंपनीकडे विमा का काढला हे समजण्यापलीकडे आहे. परंतु करण ससाणे व काँग्रेस नगरसेवकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याने कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या विमा योजनेत आरोग्य, बांधकाम,पाणीपुरवठा, अतिक्रमण, वसुली ,लाईट, वाहन या विभागात ठेक्यावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com