श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील पढेगाव- बेलापूर रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुळातच या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाकडून थातूरमातूर डागडुजी करून खड्डे बुजविले जातात. दोन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने हा रस्ता धोकादायक बनत आहे.

शिर्डी व शिंगणापूर या दोन महत्वाच्या देवस्थानांना जोडण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून काही वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. शिर्डीहून राहुरीमार्गे शिंगणापूला जाण्यासाठी भक्तांना बराच अवधी लागायचा. त्यामुळे शासनाकडून शिर्डी- बेलापूर- पढेगाव- भेर्डापूर- पाथरे- सोनई- शनीशिंगणापूर असा जवळच्या रस्त्यास मंजूरी मिळाली.

मंजूरीनंतर रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्यांतर्गंत पढेगाव ते बेलापूर रस्त्याचे काम करण्यात आले होते. रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असल्याने काही दिवसातच हा रस्ता दोन्ही बाजुंनी खचला. रस्त्याच्या दोन्ही बाजु चेपल्याने मधोमध उंचवटा तयार झाल्याने वाहन चालकांची वाहन चालविताना त्रेराधीरपट उडत आहे.

तालुक्यातील भेर्डापूर, कान्हेगाव, कारेगाव, पाथरे आदी गावातील प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. तसेच या रस्त्यावरून सतत जड वाहतूक सुरू असते, तसेच सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू असल्याने डबर ट्रॉलीने ऊस वाहतूक सुरू असल्याने रस्त्यांची आणखीच वाट लागली आहे.

रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे.अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या परिसरातील दुचाकीस्वारांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांप्रमाणे नागरिकांचे शरीरही खिळखिळे झाले आहे. त्यात पढेगाव ते उंबरगावदरम्यान तर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. साईडपट्टा खचल्याने वाहन चालकांना वाहन नेमके कोठून चालवावे? असा प्रश्न पडत आहे. संबंधीत विभागाने या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

शिर्डी- शिंगणापूर रस्त्याचे काम होऊन बजयाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. जड वाहतूकीमुळे रस्ता खराब झाला असून वारंवार थातूरमातूर डागडुजी होत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांची रुंदी वाढत आहे. त्यामुळे खड्डयांत आदळून दुचाकी, चारचाकी वाहनांचा अपघात होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे निवासस्थान या रस्त्यावर असल्याने त्यांचे या रस्त्यावरून नेहमी जाणे असतानादेखील या रस्त्याच्या दुरवस्थेकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.
- अविनाश काळे, भाजप शाखा अध्यक्ष, पढेगाव.

पढेगावसह पंचक्रोशीतील गावांच्या वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाजया या रस्त्याची खड्डयांमुळे दुर्दशा झाली आहे. याबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यातील इतर गावांच्या रस्त्यांसाठी निधीची तरतुद होते, पण या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याला निधी का मिळकत नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. संबंधीत विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा करून या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
- मुकूंद लबडे, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य

रस्ता दुरुस्तीचा देखावा

या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित होताच संबंधीत विभागाकडून रस्त्याच्या डागडुजीचा देखावा करण्यात येतो. एका दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवले जातात. पुन्हा एक दोन महिन्यात वाहतुकीमुळे या रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने प्रवासी वैतागले आहेत.