श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर नगरपरिषदेकडून घाण वास असलेले बेचव रंगहीन पाण्याच्या सर्रास पुरवठा होत आहे.

तरी लवकरात लवकर शहरात शुध्द पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा दि. 7 डिसेंबरपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा जे. जे. फाउंडेशनच्यावतीने देण्यात आला आहे.

शहरात अशुध्द पाणी पुरवठा होत असून याप्रकरणी मुख्याधिकारी यांना काही दिवसांपूर्वी दूषित पाण्याचा पुरवठा त्वरीत थांबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे लेखी निवेदन देण्यात आले.

नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने दि. 7 डिसेंबरपासून जे. जे. फाउंडेशनच्यावतीने बेमुदत अमरण उपोषणासह वेगवेगळ्या स्वरुपाची आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.

शहरातील नागरिकांना स्वच्छ, निर्मळ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. घाण वास असलेले पाणी, गढूळ झालेले बेचव व रंग बदलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना ताप येणे, घसा दुखणे, सर्दी-पडसे यासारखे आजार निर्माण झालेले आहेत.

सत्ताधारी-विरोधक एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही. नगरपरिषदेमधील सुंदोपसुंदी वाक्प्रचारामुळे नागरिकांची चांगलीच करमणूक होत असून शहराची उंचावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळत चालली आहे. एकेकाळी नावारुपास आलेली नगरपरिषद आता ग्रामपंचायतीसारखी झाली आहे, असेही श्री.जमादार यांनी म्हटले आहे.