श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे

शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झालेला आहे. शहर स्वच्छ करा अन्यथा पालिकेसमोर कचरा फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे रितेश एडके यांनी दिला आहे.

शहराच्या दोन्ही भागास जोडणार्या रेल्वे अंडर ग्राऊंड पुलाच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते यातून अनेक अपघातही घडलेले आहेत. सिदार्थनगर मध्येही मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून सफाई कर्मचार्यांनी गटारी वेळेत साफ न केल्याने त्या तुंबल्या आहेत.

शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचून डासांचे व इतर किटकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लहान बालके, वृध्द व्यक्ती यांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. नगरपालिकेच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे संपूर्ण शहरास त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. शहरातील घाण व कचर्याबाबत अनेक संघटना, पक्ष यांनी नगरपालिकेस अनेकदा तोंडी व लेखी निवेदने दिलेली आहेत; परंतु नगरपालिकेने त्यांना केराची टोपली दाखविली आहे.

नगरपालिकेत सत्ता आल्यापासून सत्ताधार्यांनी शहरात पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून कुठलीही विकासकामे झाली नाहीत. शहरवासीय हा त्रास गेल्या 4 वर्षांपासून सहन करीत आहे व आता यावर्षी नगरपालिकेची निवडणूक होत असल्याने सत्ताधारी शाहरवासियांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तरी नगरपालिकेने शहरातील संपूर्ण कचरा उचलावा तसेच तुंबलेल्या गटारी साफ करून शहरामध्ये स्वच्छता करावी, अन्यथा रिपाइंच्यावतीने नगरपालिका कार्यालयासमोर कचराफेको आंदोलन करणार असल्याचा इशारा रितेश एडके यांनी दिला आहे.