श्रीरामपूर नगरपरिषद
श्रीरामपूर नगरपरिषद
सार्वमत

श्रीरामपूर नगरपालिकेला डेली मार्केट ठेकेदारांचा चौथ्यांदा गंडा

40 लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक : मुजफ्फर शेख

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या चालू असलेल्या डेली मार्केट ठेकेदारांकडे तब्बल आठ लाख रुपये थकले आहेत. त्यामुळे डेली मार्केट ठेक्यात गेल्या तीन वर्षांत चार ठेकेदारांनी सुमारे 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांना पालिकेला गंडा घातल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी केला आहे.

श्री. शेख म्हणाले , श्रीरामपूर नगरपरिषदेच्या डेली मार्केट ठेक्याला गेल्या तीन वर्षांपासून साडेसाती लागली आहे. याचे कारण असे की, नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्याच सभेत लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी जाहीर केले की, या मागील काळात डेली मार्केट ठेक्यात मोठा गैरव्यवहार झाला आहे.

मात्र आता सदर ठेक्यापोटी नगरपरिषदेला दरवर्षी एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, असे जाहीर केले मात्र गेल्या तीन वर्षांत सदर कामाच्या चार ठेकेदारांनी नगरपरिषदेला लाखो रुपयांला चुना लावला आहे.

गेल्या तीन वर्षांत डेली मार्केट ठेका मोठ्या प्रमाणावर गाजला. सदरच्या ठेक्यात झालेल्या गैरव्यवहारा विरोधात उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह आम्ही काँग्रेस नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत लाक्षणिक उपोषण केले. त्यावेळी संबंधित ठेकेदार थोरात यांच्या विरोधात तब्बल पालिकेचे 25 लाख रुपये बुडवले प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र त्यानंतरही सदर कामाचे ठेकेदार पालिका प्रशासनाला जुमानायला तयार नसल्याचे शेख यांनी म्हटले आहे.

मागील तीन वर्षांपासून सदर कामाचे चार ठेकेदार बदलले गेले. त्यामध्ये भोसले यांच्याकडून 9 लाख, शेळके यांच्याकडून 2 लाख, थोरात यांच्याकडून 25 लाख आणि सध्या काम करत असलेला अभंग या ठेकेदाराकडून 8 लाख असे जवळपास तीन वर्षांत सुमारे 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांना ठेकेदारांनी पालिकेला गंडा घातल्याचेही श्री. शेख यांनी म्हटले आहे.

एकीकडे सामान्य नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास विलंब झाल्यास पालिका प्रशासन व्याजासह दंड आकारणी करते आणि दुसरीकडे पालिकेला फसवणार्‍या ठेकेदारांवर पालिका प्रशासन मेहेरबान असल्याचे सध्यातरी दिसून येत असल्याचा आरोप नगरसेवक शेख यांनी केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com