श्रीरामपूर पालिका सभेत पहिल्याच विषयावरील चर्चेमुळे गदारोळ

सर्व विषय मंजूर करा || 16 नगरसेवकांचे पत्र; बहुमताने आलेल्या पत्राला नगराध्यक्षांची मंजुरी
श्रीरामपूर पालिका सभेत पहिल्याच विषयावरील चर्चेमुळे गदारोळ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपालिकेच्या मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या विषयावर जवळपास दोन तासांहून अधिक काळ चर्चा आणि वादंग सुरू राहिल्यामुळे हा विषय संपत नाही म्हणून एका विषयावरून दुसर्‍या विषयावर सभेचे कामकाज पुढे चालणार नसेल तर यापुढील सर्व विषय मंजूर करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन 16 नगरसेवकांच्या सहीनिशी पिठासिन अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. पिठासीन अधिकार्‍यांनीही बहुमताने निवेदन आले असल्यामुळे यापुढील सर्व विषय मंजूर करत असल्याचे सांगून पहिल्याच विषयावर सभा संपविली. मात्र यास विरोधी नगरसेवकांनी अशा निर्णयास आमचा विरोध असल्याचे सांगत विरोध दर्शविला. या दोन तासांत इतिवृत्तात झालेल्या चुका, दोन दोन वेळेस काढण्यात आलेली कामे व त्यावर खर्च झालेबाबतच्या विषयावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी होऊन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

श्रीरामपूर नगरपरिषदेचे वार्षिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी बजरंग व्यायाम शाळेची दुरुस्ती, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती, भूमिगत गटार योजना याबाबतचे विषयातील चुका, तसेच इतिवृत्तात अधिकार्‍यांचा कामचुकारपणा दाखवत असतानाच त्याला वेगळे वळण लागले. यावेळी नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख यांनी भुयारी गटार योजनेची काम झालेली नसताना ठेवेदाराला पेमेंट कसे काय केले. तसेच जी कामे निकृष्ठ झालेली आहेत त्याचे पेमेंट ठेकेदाराला न देण्याचे नगराध्यक्षांनी सभेत सांगितलेले असतानाही ते पेमेंट का दिले? असा सवाल करत आरोप प्रत्यारेाप केले.

त्यावर मला कोणी बॅग देऊन अथवा पाकीट देऊन विकत घेऊ शकत नाही, मी विकास कामे केली आहेत, असे विरोधकांच्या आरोपला रोखठोक उत्तर देत नगराध्यक्षा आदिक यांनी विरोधकांच्या भुयारी गटार प्रश्नावरही सडेतोड उत्तरे दिली. त्यानंतर डबल रस्त्याचा प्रस्ताव कसा? असा मुद्दा उपस्थित केला तेव्हा नगराध्यक्षा आदिक यांनी संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारताच त्यांनी तांत्रिक चूक मान्य केली. तर बालिका विद्यालयाजवळील सर्कलचा विषयही चांगलाच गाजला. याअगोदर या सर्कलवर निधी खर्च केला तरीही सुशोभिकरणासाठी अधिक पैसा का खर्च करत आहात? त्यावर नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण यांनी या चांगल्या कामाला विरोध करू नका. या सर्कलला अटलबिहारी वाजपेयी नामकरण करण्यात आले आहे. त्यास विरोध करू नका असे सांगितले.

यावेळी किरण लुणिया यांनी राज्य शासनाकडून सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत किती प्रस्ताव पाठविले, किती निधी आला याचे उत्तर द्या, अशी मागणी केली असता सत्ताधारी नगरसेवकांनी शहरात अनेक विकास कामे चालू आहेत. ती विना निधीची सुरू आहेत का? असा प्रश्न केला. त्यावर लुणिया म्हणाले की, माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या चार वर्षांत एक़ही प्रस्ताव पाठविला नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून निधी मिळाला नाही. हे नगरपालिकेचे कागद सांगत आहेत. त्याचवेळी मुंबई वारीचा विषय निघाला. तेव्हा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी बांधकाम विभागाला 5 कोटी रुपयांचा निधी मिळविला.

108 कोटीच्या पाणी योजनेचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यानंतर अनुराधाताई आदिक यांनी मुख्य विषयावर बोला, विषय लांबवू नका, अशी भूमिका घेतली. तेव्हा राजेंद्र पवार, रवी पाटील, मुख्तार शहा यांच्यासह 16 नगरसेवकांच्या सह्या असलेले आजच्या सर्व विषयांना मंजुरी व आयत्यावेळच्या विषयांना मंजुरी अशी भूमिका घेत सत्ताधारी गटाने सर्व विषयांना मंजुरी दिली. तर विरोधी नगरसेवक शेख, बिहाणी, फंड यांनी तांत्रिक अडचणी दाखवून विरोध केला.

ज्येष्ठ नगरसेवक अंजुम शेख यांनी सत्ताधारी व विरोधकांना तुम्ही एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा कँंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या पक्षातील मंत्री आहेत. त्यांनी एकत्र येऊन भुयारी गटार योजनेसाठीची जागा मिळवावी. शहराच्या विकासासाठी सत्तेच्या माध्यमातून काम करावे, असे आवाहन केले. मागच्या मिटींगमध्ये चर्चेत राहिलेला बेलापूर रोड, वॉर्ड नं. 7, अशोक थिएटरमागील परिसराला बजरंगनगर नाव देण्याचा ठराव बहुमताने सभागृहात मंजूर झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com