श्रीरामपूर नगरपालिकेच्या कचरा डेपोला आग

धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार
श्रीरामपूर नगरपालिकेच्या कचरा डेपोला आग

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मधील खबडी येथे असलेल्या नगरपालिकेच्या कचरा डेपोला काल सकाळी अचानक आग लागली. आग विझविण्यात नगरपालिकेच्या अग्निशामक दलास यश आले असले तरी सायंका़ळीही कचर्‍यातून मोठ्या प्रमाणात धूर सुरू होता. आगीचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही.

काल सकाळी कचरा डेपोतून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. त्यांनी तातडीने नगरपालिकेशी संपर्क साधून आगीची माहिती दिली. त्यानंतर अगिनशामक दलाचे जवान पाण्याच्या बंबासह दाखल झाले. बर्‍याच कालावधीनंतर आग विझविण्यात अग्निशामक दलास यश आले. असे असले तरीही या ठिकाणाहून दिवसभर मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. सायंकाळपर्यंत तो तसाच होता. म्हणजेच आग उशिरापर्यंत धूमसत असल्याचे दिसून आले. या कचरा डेपोतून विषारी धूर निघून दुरवर पसरत आहे.

या डेपोच्या जवळच जर्मन हॉस्पिटल, रयत शिक्षण संस्थेची तीन कॉलेजेस, रेव्हेन्यू कॉलनी, हुसेननगर, उपाध्ये मळा, हरिओम सोसायटी असा रहिवाशी परिसर आहे. तीव्र उन्हाळ्यात नागरिकांना विषारी धुरामुळे दारे खिडक्या बंद करून घेण्याची वेळ आली. या धुरामुळे अंधत्व तसेच फुप्फुसाचा कॅन्सर होऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.

यासंदर्भात वेळोवेळी नगरपालिकेला तक्रार करून दखल घेतली गेलेली नाही. हा धूर अत्यंत घातक असून सकाळपासून या भागातील कुटुंबे अस्वस्थ व घबराटीने त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांना तातडीने कळविण्यात आले असून या धुरापासून होणारा प्रादुर्भाव व विषारी धुरापासून संरक्षण व्हावे व कार्यवाही करावी, अशी मागणी मनोजकुमार नवले, इम्रान पठाण यांनी केली आहे. प्रशासनाने दखल घेतली नाही तर जागृत नागरिक संघ व या भागातील नागरिक महिला प्रांताधिकार्‍यांच्या दालनासमोर उपोषण करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. कचरा डेपो या ठिकाणाहून हलवावा यासाठी नागरिक पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना निवेदन देणार असल्याचे नवले यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, आग कशाने लागली याबाबत माहिती नाही. तीव्र उन्हामुळे आग लागण्याची शक्यता आहे. नगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली आहे. आतून धुमसत असल्याने धूर निघत असून तो विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्रीतून आग पूर्णपणे आटोक्यात येईल. डेपोतील कचरा रिसायकलींग करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मान्यता मिळाल्यानंतर वारंवार आग लागण्याच्या घटना होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com