श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीला गटबाजीचे ग्रहण !

निवडणूक अचानक जाहीर झाल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांची होणार दमछाक
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीला गटबाजीचे ग्रहण !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

निवडणूक आयोगाने अचानक नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करून अनेकांना धक्का दिला आहे. अचानक निवडणूक लागल्याने तसेच त्यासाठी अवधी कमी असल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होणार आहे. ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील असा अंदाज बांधला जात असताना निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करून सर्वांचीच धाकधूक वाढविली आहे. दरम्यान सर्वच पक्षांमध्ये गटबाजी असल्याने या निवडणुकीला गटबाजीचे ग्रहण लागणार आहे.

श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पुर्वी 16 प्रभागातून 32 सदस्य होते. नव्या रचनेनुसार आता 17 प्रभागातून 34 सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात उमेदवार निश्चित करण्यासाठी आता नेते मंडळींना कसरत करावी लागणार आहे. तसेच ही निवडणूक पक्ष चिन्हानुसार होणार की, गटवाईज हे अद्याप निश्चित नसल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. पक्षनिहाय निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेणार आहेत. प्रत्येक पक्षात दोन दोन गट असल्यामुळे त्यांची मने जुळवण्यात नेते किती यशस्वी होतात, तेही महत्वाचे ठरणार आहे.

ससाणे व आ. कानडे गटाला एकत्र आणण्याची जबाबदारी आ. बाळासाहेब थोरात यांना पार पाडावी लागणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीपासून माजी आमदार भानुदास मुरकुटे व ससाणे गटाची युती झाली आहे. ती या निवडणुकीतही कायम राहील अशी शक्यता आहे. भाजपातही दोन-तीन गट असल्यामुळे आ. विखे काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. आदिकांचा राष्ट्रवादी गट कोणाबरोबर युती करणार हे अद्याप निश्चित नाही.

गेल्या निवडणुकीत भाजपासह सर्वपक्षियांची मिळालेली मोठी ताकद विचारात घेता सध्या तरी आदिक गट एकाकी पडल्याचे दिसत आहे. शिवसेना कोणाशी सलोखा करणार हे स्पष्ट नाही. छोटे घटक पक्ष काय करणार याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. निवडणुकीसाठी कमी कालावधी असल्यानेे राजकीय घडामोडी तसेच तडजोडीसाठी कमी वेळ मिळणार आहे. कमी कालावधीत कोण, कशी आखणी करतो, ते महत्वाचे ठरणार आहे.

2016 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आ. स्व. जयंत ससाणे यांच्या गटा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप यांनी एकत्रित मोट बांधली होती. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी अनुराधा आदिक यांच्या रूपाने नवा चेहरा मिळाला. मात्र निवडणुकीत 32 सदस्यांपैकी काँग्रेसचे 22 तर विरोधकाचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेसचे अंजूम शेख यांच्यासह बारा नगरसेवकांनी आदिक यांना पाठींबा दिला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ससाणे गटाने आ. लहू कानडे यांची तर अंजूम शेख गटाने शिवसेनेचे माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचा प्रचार केला.

आगामी निवडणुकीसाठी आ. राधाकृष्ण विखे यांनी शहरात भाजपची मोट बांधण्यास सुरवात केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही चाचपणी केली आहे. दरम्यान, सर्वच पक्षांत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. ससाणे व कानडे यांचे दोन गट पडले आहेत. अंजूम शेख गटाने कानडे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. अशोक कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ. भानुदास मुरकुटे व करण ससाणे यांच्यात समझोता झाला आहे. भाजपमध्ये अंतर्गत दोन व विखे यांना मानणारा एक असे तीन गट आहेत. इतर पक्ष व संघटनांकडूनही अनेक जण इच्छूक आहेत.

त्यामुळे या निवडणुकीत कोण कशी युती करते, यावर बरेच काही अवलंबून आहे. आता निवडणूक तर जाहीर झाली. निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 4 ऑगस्ट उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मात्र अवधी कमी असल्याने मेेळावे घेणे, पॅनल तयार करणे, गाठीभेटी व प्रचार यासाठी कार्यकर्त्यांसह नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com