श्रीरामपूर नगरपालिकेसाठी आ. विखेंची मोर्चेबांधणी सुरु

गरज पडली तर प्रबळ गट सोबत घेण्याची तयारी || भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी ‘गुफ्तगू’
आ. विखे
आ. विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आगामी नगरपलिका निवडणुकीत श्रीरामपूर पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून वेळ पडल्यास शहरातील एखादा प्रबळ गट सोबत घेण्याचा विचार असल्याचे सूतोवाच आ. विखे यांनी श्रीरामपुरात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

राज्यातील जास्तीत जास्त नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी सत्ता मिळविणे शक्य होवू शकते त्या नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात सर्व्हे करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना चाचपणी करण्याच्या सूचना पक्ष पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (मंगळवारी) रात्री अचानक श्रीरामपुरात येवून भाजपा कार्यकर्ते व माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांच्या निवासस्थानी भाजपाच्या स्थानिक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पालिका निवडणुकीबाबत चर्चा केली. काहीही झाले तरी श्रीरामपूर नगरपालिका ताब्यात घ्यायची त्यासाठी वेळ पडली तर श्रीरामपुरातील एखादा प्रबळ गट सोबत घेण्याची तयारी असल्याचे सूतोवाच आ. विखे यांनी यावेळी केले.

भाजपाचे माजी शहराध्यक्ष गणेश राठी यांनी शहरात सध्या भाजपाची ताकद चांगली वाढली आहे. आपण आपल्या ताकदीवर सत्ता मिळवून शकतो असे सांगून एखादा गट सोबत घेण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.

त्यावर आ. विखे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. त्यानुसार लवकरच याठिकाणचा सर्व्हे करण्यासाठी एजन्सीचे लोक येतील. श्रीरामपुरातील एका प्रबळ गटाशी माझी चर्चाही झाली आहे. त्यांना सोबत घेतले तर पालिकेची सत्ता मिळविणे सोपे होईल. याशिवाय इतर विषयावरही आ. विखे यांनी चर्चा केली.

बैठकीनंतर प्रकाश चित्ते यांनीही श्रीरामपुरातील गट सोबत घेतल्यास आमच्यावर अन्याय होईल, असे आ. विखे यांना सांगितले. त्यावर नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघाल्यावर त्यावर निर्णय घेता येईल असे आ. विखे म्हणाले.

या बैठकीस भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपा शहराध्यक्ष मारुती बिंगले, माजी शहराध्यक्ष गणेश राठी, संदीप चव्हाण, जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com