श्रीरामपूर नगरपालिकेत आता 32 ऐवजी 34 नगरसेवक

श्रीरामपूर नगरपालिकेत आता 32 ऐवजी 34 नगरसेवक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेत यापूर्वी 32 नगरसेवक संख्या होती आता ही संख्या दोनने वाढविली जाणार असल्यामुळे आता श्रीरामपूर नगरपालिकेत 34 नगरसेवक निवडून येणार आहेत. आता शहरात 16 ऐवजी 17 प्रभाग तयार केले जाणार असून प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक राहणार आहेत.

जिल्ह्यातील विधानपरिषद निवडणूक तांत्रिक बाबीमुळे पुढे गेली असून नगरपरिषद निवडणुकीच्या हालचाली काही प्रमाणात सुरु झाल्या आहेत. सध्या प्रत्येक नगरपालिकेत किती सदस्य संख्या असायला हवी याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ज्या ज्या नगरपालिकांची मुदत संपली त्या ठिकाणी प्रभागनिहाय वॉर्ड रचना तयार करण्याचे काम प्रशासकय पातळीवर सुरु आहे. तसेच मतदार यादीपासून ते संबंधित निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाने केल्या आहेत. राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाची व जिल्ह्यात नावाजलेली श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया शासकीय पातळीवर आता सुरू झाली असून श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या 32 होती. आता नवीन नियमामुळे श्रीरामपूर नगरपालिकेचे 34 नगरसेवक नागरिकांना निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे दोन नगरसेवक यावेळी वाढणार आहेत.

प्रत्येक भाग दोन नगरसेवकांचा असून जोडीजोडीने ही निवडणूक लढविली जाईल. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वॉर्डरचने बरोबरच प्रभाग रचनेसाठी दोन नगरसेवक वाढल्याने बदल होणार असून या संबंधी तातडीने नाशिक विभागीय आयुक्तांकडून वाढीव नगरसेवक पदासंबंधी मंजुरी घेऊन श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. या मंजुरीला साधारण आठ दिवस लागतील. त्यामुळे आता श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया जवळ जवळ सुरू झाल्यासारखीच असून प्रभाग रचना, त्यावरील हरकती, मतदारयादी व भाग राखीव कोणत्या प्रवर्गासाठी हा विषय होईल. एकंदरच श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक यावेळी नागरिकांतून नगराध्यक्ष नसल्याने व नगरसेवकातून नगराध्यक्ष असल्याने आपल्या गटाचे कसे जास्त नगरसेवक निवडून आणता येतील यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपापल्यापरीने काम सुरू केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com