श्रीरामपुरात पालिका निवडणुकीची जुळवा-जुळव

माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांची शहर काँग्रेस कार्यालयास भेट
श्रीरामपुरात पालिका निवडणुकीची जुळवा-जुळव

श्रीरामपूर |अशोक गाडेकर| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्ताधारी व विरोधी गटाकडून राजकीय जुळवाजुळवही सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांच्या संपर्क कार्यालयास दिलेल्या सदिच्छ भेटीमुळे राजकीय गोटात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

श्रीरामपूर नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय भूकंपामुळे पालिकेतील सत्तेचे समिकरण बदलले. काँग्रेसचा 10 नगरसेवकांचा गट फुटून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या गटात सामील झाला. त्यामुळे बहुमत असतानाही उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना प्रबळ विरोधकांची भूमिका बजावता आली नाही. या फुटीर गटात माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव अ‍ॅड. संतोष कांबळे हेही सहभागी झाल्याने कांबळे कुटुंबिय काँग्रेसच्या ससाणे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेपासून दुरावले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आ. कांबळे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली. या निवडणुकीच्या काळात माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील माजी व आ. भानुदास मुरकुटे यांची साथ त्यांना लाभली. मात्र ससाणे संघटनेच्या प्रखर विरोधामुळे कांबळे यांना पराभवास सामोरे जावे लागले.

दरम्यान अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुच्या तोंडावर गेल्या अनेक वर्षांचे कट्टर विरोधक असलेले ससाणे-मुरकुटे एकत्र आले. ही युती आगामी सर्व निवडणुकीत कायम ठेवण्याची घोषणा माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी ससाणे व मुरकुटे यांनी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या निवासस्थानी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. तेव्हापासून ससाणे-मुरकुटे युती उघडपणे धावायला लागली. मात्र काँगे्रसचे आ. लहू कानडे व त्यांच्या समर्थकांना ही युती मान्य नसल्याने पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी अशोक कारखाना निवडणुकीत शेतकरी संघटना व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्याशी युती करून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

दुसरीकडे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह माजी आ.स्व.जयंत ससाणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आ. लहू कानडे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्याने पालिका निवडणुकीसह आगामी काळातील राजकीय खेळीसाठी ससाणे गटाने राजकीय जुळवा-जुळव सुरु केली आहे. माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांना शहर काँग्रेचे अध्यक्ष संजय छल्लारे यांनी दिलेले चहापानाचे निमंत्रण त्याचाच एक भाग असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आदिक गटाने पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय जुळवा-जुळव सुरु केली आहे. सत्तेत पाठिंबा दिलेला मात्र मध्यंतरीच्या काळात काही कारणाने दुरावलेले अंजुम शेख, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी यांच्यातही ‘झाले-गेले विसरून जावे’ असे समजून पालिका निवडणुकीत पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com