काँग्रेस नगरसेवकांचा श्रीरामपूर पालिकेत सभात्याग

मोघम बिले दाखवून 18 लाख 23 हजाराची बोगस बिले काढल्याचा आरोप
काँग्रेस नगरसेवकांचा श्रीरामपूर पालिकेत सभात्याग
श्रीरामपूर नगरपरिषद

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - नगरपरिषदेच्या मार्च महिन्यात झालेल्या ऑनलाईन सभेत बोगस बिले करुन, कामे न करता पैसे काढले. तसेच संजयनगर व ईदगाह परिसर येथील परिसराचे नागरिकांना अंधारात ठेवून गोविंदनगर नामकरण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळा संदर्भातील विषय विशेष सभेत न घेता याच मिटींगमध्ये उरकण्याचा घाट घातला याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकांनी कालच्या ऑनलाईन सभेचा सभात्याग केल्याची माहिती उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील सुयोग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मनोज लबडे, नगरसेविका भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, मीराताई रोटे, रितेश रोटे आदी उपस्थित होते.

श्री. ससाणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळा शिवाजी चौकात बसवावा. या संदर्भात 22 नगरसेवकांनी विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली असताना सदर विषयाला बगल देण्यासाठी सर्वसाधारण सभेत हा विषय घुसडविण्यात आला. तसेच भिमाशंकर परदेशी, इशान हुसेन पठाण, धीरज शांतीलाल गुजर या ठेकेदारांच्या नावाने किरकोळ कामाच्या नावाखाली 18 लाख 23 हजार 220 रुपयांची बोगस बिले काढण्यात आली. त्यात अनेक कामे परत परत वेगवेगळ्या नावाने दाखविण्यात आली.

घनकचरा ठेका महिन्याला 23 लाख रुपये गेलेला असताना पालिकेने ओम मशिनरी अ‍ॅण्ड इलेक्ट्रीकल या हार्डवेअर दुकानातून 23 हजार 440 रुपयांची झाडू खरेदी केली. सॅनिटायझर ड्रम 1800 रुपयांना खरेदी केले. सुधीर संतोष जाधव या ठेकेदाराच्या नावाने रंग काम करणे या नावाखाली 4 लाख 45 हजार 624 रुपयांची बोगस बिले काढण्यात आली. फ्लेक्स बोर्डचा वार्षिक छपाईचा रेट 31 रुपये प्रति स्क्वेअर फुट एवढा दाखविण्यात आला.

नागरिकांची मागणी नसताना संजयनगर, ईदगाह परिसर, मिल्लतनगर, रामनगर, गोपीनाथनगर या परिसराला नगरसेवकाच्या मागणीवरुन गोविंदनगर नाव देण्याचा घाट घातला. त्याच नगरसेवकांनी या विषयाला अनुमोदन देत संबंधीत भागाचे नामकरण करण्यात आले. सर्वांना अंधारात ठेवून व ऑनलाईन सभेच्या आडून फसव्या पद्धतीने हा ठराव करण्यात आला.

ऑफलाईन पद्धतीने ही सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. परंतु ऑनलाईन मिटींगच्या आड लपून मनमानी कारभार व नागरिकांची फसवणूक करायची असल्याने नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक ऑनलाईन मिटींगचे आयोजन केले. याचा निषेध करत काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे वरील तीनही विषयांना विरोध दर्शवणारे पत्र देत सभात्याग केला. भविष्यात या सर्व बोगस बिलांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे काँग्रेस नगरसेवकांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com