श्रीरामपूर नगर परिषद : विरोधकांच्या अनुपस्थितीत सर्व विषयांना मंजुरी

ऑनलाईन सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रस्ताव
श्रीरामपूर नगर परिषद : विरोधकांच्या अनुपस्थितीत सर्व विषयांना मंजुरी
श्रीरामपूर नगरपरिषद

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - येथील नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शासनाच्या नियमाच्या अधीन राहून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. विरोधी नगरसेवकांच्या बहिष्कारामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताने या सभेत सर्व विषयांना मंजुरी दिली.

नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे उपस्थित होते.

विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकत केलेल्या कामाची वाढीव बिले काढली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वच्छतेसाठी लागणारी झाडू व इतर सामान खरेदी हे सर्व लपवण्यासाठी सत्ताधार्‍यांनी ऑनलाइन सभा घेतल्याचा आरोप केला होता. विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी सांगितले, विरोधकांनी बिलासंदर्भात केलेल्या आरोपांबाबत मी स्वतः सहा जुलै रोजी मुख्याधिकारी यांना आक्षेप असलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा व काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराच्या जागेचा प्रस्ताव पाठविण्याचा ठरावही आजच्या सभेत करण्यात आला. नगरसेविका स्नेहल खोरे यांनी प्रभाग सोळा मधील दौंडे यांचे घर समोरील रस्त्याला हरकत घेतली यावर नगराध्यक्ष आदिक म्हणाल्या शहरांमध्ये नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे पालिकेचे काम आहे, त्याठिकाणी दौंडे यांच्यासह काही कुटुंब राहतात त्यांची अनेक दिवसांपासून रस्त्याची मागणी होती त्यामुळे तो रस्ता केला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपात जामिनावर असलेल्यांनी नगराध्यक्षावर बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, येथून पुढच्या काळात असे आरोप केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे नगरसेवक श्यामलिंग शिंदे, मुक्तार शाह, दीपक चव्हाण, रवी पाटील, संतोष कांबळे, ताराचंद रणदिवे, राजेंद्र पवार, निलोफर शेख, वैशाली चव्हाण, प्रणिती चव्हाण, चंद्रकला डोळस, जयश्री शेळके, जयदाबी कुरेशी, तरन्नुम जहागिरदार, अक्सा पटेल यांनी सांगितले.

ऑनलाइन सभेत खोरे-आदिकांची जोरदार खडाजंगी

नगरपालिकेच्या पार पडलेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवावा म्हणून 24 नगरसेवकांनी विशेष सभा घ्यावी ही मागणी केलेली असतानाही विशेष सभा न घेणार्‍या सत्ताधारी गटाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला. प्रभागातील गटारींच्या दुरुस्तीचे, चरावर पाईप टाकण्याच्या कामाचे पत्र देऊनही कामे केली जात नाही मात्र रिकाम्या प्लॉट, रिकाम्या बिल्डिंग पुढे रस्ते, पाईप टाकण्याचे पाप केले जाते? याचा खुलासा मागितल्यावर नगराध्यक्षा अनुराधा आदिकांनी स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत सगळीकडे काम करत असल्याचे सांगितले. यावर खोरे यांनी पूर्णवादनगरच्या नागरिकांचे पावसात होणारे हाल दिसत नाही का? तिथे तुम्ही कधी आल्या का? एखाद्या पावसात येऊन बघा असे अध्यक्षांना सांगितले. या प्रकरणावरून नगराध्यक्षा अनुराधा आदिक व नगरसेविका स्नेहल खोरे यांच्यात खडाजंगी झाली.

सत्ताधार्‍यांनी आपले गैरव्यवहाराची 1 कोटी 15 लाख 145 रुपयांची 264 बिले मंजूर करुन घ्यायची होती म्हणून कालची ऑनलाईन सभा बोलवली होती. कोणीही यास विरोध करु नये म्हणून विरोधकांना सभागृहात प्रवेश दिला नाही. दरवाजावर कोणालाही प्रवेश देवू नये असा फलकच लावला होता. मी नगरसेवक असताना मला प्रवेश नाकारण्यात आला. मी पुढील दरवाजाने गेलो तर बेकायदेशीर सभागृहात घुसले त्यांचेविरुध्द कारवाई करा असे आदेश दिले. अन्य सदस्य आतमध्ये असतानाही मला प्रवेश नाकारला. तसेच कारवाई करण्याची भाषा वापरली. याचा मी निषेध करतो.

- किरण लुणिया, नगरसेवक

मागील वर्षीच्या तसेच सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन काळामध्ये रस्त्यावरील टपरीधारक दुकानदार, हातगाडीवाले, भाजीपालेवाले, फिश मार्केट व इतर सर्वसामान्य छोटे व्यापारी अडचणीत आलेले आहेत. त्यांचे सर्व कुटुंबीय अवलंबित असलेल्या व्यापार ठप्प झालेले आहेत. सध्याही दुपारी 4 नंतर व्यवसाय बंद होत आहेत. त्यामुळे मार्केटमधील व्यापार्‍यांची व्यावसायिक परिस्थिती गंभीर आहे आणि हे छोटे व्यापारी आपली दैनिक बाजार फी भरणा करू शकत नाहीत. ठेकेदाराला सूट देण्यापेक्षा छोट्या व्यापार्‍यांची दैनिक बाजार फीच पूर्णपणे माफ करण्यात यावी व मार्च 2022 पर्यंतची दैनिक बाजार फी सरसकट माफ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

- सौ. हेमा रवींद्र गुलाटी, नगरसेविका.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com