
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराकडून 5 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या 7 मोटारसायकली तर अन्य दुसर्या घटनेत दोघा दुचाकी चोरांकडून 3 लाख 45 हजार रुपये किंमतीच्या 5 मोटारसायकली हस्तगत केल्या. एकूण 9 लाख 35 हजार किंमतीच्या 12 मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. 8 जून 2023 रोजी फिर्यादी सोपान जयराम सोनवणे (धंदा- शिक्षक, रा. शिक्षक कॉलनी, खंडाळा परसोडा रोड, ता.वैजापूर, जि. संभाजीनगर) हे त्यांच्या एच.एफ. डिलक्स एम.एच. 41, ए.पी. 0766 या मोटारसायकलवर दि. 7 जून 2023 रोजी अक्षदा मंगल कार्यालय येथे लग्नाकरिता आले होते. त्यावेळी येथून त्यांची मोटारसायकल अज्ञात ठिकाणाहून चोरी गेली होती. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथकास गाडीचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाने घटनास्थळी पाहणी करून व तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा गणेश संजय खुरासणे (वय 23, रा.माळवाडगाव, ता. श्रीरामपूर) याने केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीचा शोध घेत असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा आरोपी दि.12 सप्टेंबर रोजी वडाळा महादेव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपीस शिथाफिने पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सात मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
यामध्ये 90 हजार रुपयांची हिरो कंपनीची एचएफ. डिलक्स (एमएच 17 सीवाय 1305) श्रीरामपुरातून चोरीस गेलेली, 90 हजार रुपये किंमतीची हिरो एचएफ डिलक्स (एमएच 20 डीएस 4824) वीरगाव पोलीस ठाणे अंतर्गत चोरीस गेलेली, 80 हजार रुपये किंमतीची स्टार सिटी प्लस (एमएच 17 सीडी 1566) शिर्डी पोलीस ठाणे अंतर्गत चोरीस गेलेली, 1 लाख रुपये किंमतीची पल्सर अहमदनगर येथून चोरीस गेलेली, 85 हजार रुपयांची बजाज डिक्सव्हर (एमएच 17 एसी 4132) कान्हेगाव (ता. कोपरगाव) येथून चोरीस गेलेली, 55 हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर (एमएच 27 एजी 9135) औरंगाबाद येथून चोरीस गेलेली, 78 हजार रुपये किंमतीची स्टार सिटी राहुरी येथून चोरीस गेलेली दुचाकी अशा एकूण 7 मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
तर दुसर्या घटनेत दि. 9 सप्टेंबर रोजी फिर्यादी राहुल जुम्मन खंडारे (वय 30, रा. गोंधवणी रोड, श्रीरामपूर) यांची मोपेड मोटारसायकल (एमएच 17 सीयु 2861) श्रीरामपुरातील हॉस्पिटलच्या बाहेरून चोरीस गेली होती. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार केलेल्या तपासात सराईत आरोपी अरबाज आयुब पठाण (वय 20, रा. हुसेननगर, श्रीरामपूर) व आदम युसूफ शहा (वय 27, रा. काझीबाबा रोड, श्रीरामपूर) या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून त्या हस्तगत करण्यात आल्या. त्यामध्ये 85 हजार रुपये किंमतीची बी.टी.सुझुकी कंपनीची (एमएच17 सी.यु. 2861), 80 हजार रुपये किंमतीची बजाज डिस्कव्हर मोटार सायकल, 50 हजार रुपये किंमतीची होडा कंपनीची मोपेड (एमएच.17.ए.वाय.1901), 60 हजाराची स्कुटी पेप मोपेड (एम.एच.17, सी.डब्ल्यु. 3170), 70 हजार रुपये किंमतीची सुझुकी मोटारसायकल असा एकूण 3 लाख 45 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.