श्रीरामपुरात मनसेच्यावतीने मुंडन आंदोलन

पालकमंत्र्यासह लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे मागणीसाठी
श्रीरामपुरात मनसेच्यावतीने मुंडन आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींकडून करोनाग्रस्त रुग्णांना कुठल्याच प्रकारचे वैद्यकीय सेवेची पूर्तता होत नसल्याने अनेकांचे मृत्यू होत आहे. या सर्व नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार धरून पालकमंत्रीसह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्यासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले.

या मुंडन आंदोलनप्रसंगी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या काळात अनेकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही ज्यांना बेड मिळाले त्यांना इंजेक्शन. ऑक्सीजन मिळत नाही. अनेक तालुक्यांमध्ये तर व्हेंटिलेटरच उपलब्ध नाही.

करोना रुग्णांना वेळेत योग्य ते वैद्यकीय सेवा मिळत नसल्याकारणाने अनेकांचे मृत्यू होत आहे अशा गंभीर परिस्थितीत पालकमंत्री व जिल्ह्याचे इतर दोन मंत्री, खासदार. आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष. नगराध्यक्ष. पंचायत समिती सभापती व सर्व ग्रामपंचायत सरपंच या सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी त्यांचा श्राद्ध घालून आजचे मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.

आजच्या मुंडन आंदोलनाची दखल घेऊन करोनाग्रस्त लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना लोकप्रतिनिधींनी यापुढे मदत न केल्यास प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरासमोर जाऊन मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्व लोकप्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असा इशारा बाबासाहेब शिंदे यांनी दिला. अशा निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com