श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूरची धावपट्टी एवढी सोपी नाही. इथे सगळ्या प्रकारचे चेंडू टाकावे लागतात, कारण गोलंदाज, फलंदाज तरबेज आहेत.

कोण कोणत्या संघात आहे हे समजत नाही पण या स्पर्धेतून श्रीरामपूरचा ‘कप्तान’ निश्चित ठरेल, असे सूचक वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नानासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार, अंबादास ढोकचौळे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, संजय छल्लारे, नितीन भागडे, केतन खोरे, सुरेंद थोरात, भिमा बागुल, मनोज हिवराळे, चित्रसेन रणवरे, दिपक चव्हाण, सरपंच सुनिल शिरसाठ, फादर सतिष कदम, फादर संजय पठारे, फादर मायकल वाघमारे आदी उपस्थित होते.

स्व.जयंत ससाणे यांच्या स्मृति या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा जागल्या. आपण सर्वानीच त्यांच्या समवेत काम केल्याचा उल्लेख करून आ.विखे पाटील म्हणाले की, कोणताही खेळच सर्वांना एकत्र आणण्याचे काम करीत असतो. या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी निर्माण होतील आणि श्रीरामपूरचा नावलौकीक सुध्दा या स्पर्धेतून होईल, अशा शब्दात त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनाच्या या भाषणात आ.विखे यांनी अनेक शाब्दिक कोट्या केल्या. स्पर्धा श्रीरामपूरला होत असल्यातरी इथली धावपट्टी एवढी सोपी नाही. या धावपट्टीवर सर्व प्रकारचे चेंडू टाकावे लागतात. फलदांज व गोलंदाज तरबेज असतील तरी क्षेत्ररक्षक सैरभर झाले असल्याकडे लक्ष वेधत कोण कोणत्या संघात आहे समजत नाही, त्यामुळेच कप्तान एक हवा. या स्पर्धेतून श्रीरामपूरचा ‘कप्तान’ ठरेल अशी सूचक टिपणीही त्यांनी केली.