
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
विखे-ससाणे-मुरकुटे यांच्या श्रीरामपूर सहकार विकास मंडळाने 17 जागा मिळवित श्रीरामपूर बाजार समितीची एक हाती सत्ता मिळविली. आता येत्या 13 तारखेला सभापती निवड होणार असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
श्रीरामपूर सहकार विकास आघाडीची विरोधात आमदार लहू कानडे, अविनाश आदिक, अॅड अजित काळे यांनी शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून चांगली लढत देत कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचे काम केले. वास्तविक शेतकरी विकास आघाडीच्या ताब्यात अत्यल्प सोसायटी व ग्रामपंचायत असतांनाही चांगले मते घेतली.व्यापारी मतदारसंघाची एक जागा ससाणे गटाने गमावली तर मुरकुटे गटाची हमाल मापाडीतील जागा अवघ्या नऊ मताने पारड्यात पडली.
दुसरीकडे युतीवरून तसेच तिकीट कापल्याने असलेली नाराजी, विकास कामाच्या मदतीने कानडे यांनी आदिक, शेतकरी संघटनेचे अॅड.अजित काळे यांच्या साथीने जवळपास 37 टक्के मतदान घेतले. मात्र, ते विजयाच्या जवळ जावू शकले नाही. विखेंसोबत युती असतांना माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरातांनी ससाणे गटाच्या विजयी उमेदवारांचा सत्कार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता येत्या 13 तारखेला सभापती पदाची निवड होत आहे.
युती होतांना पहिले दोन वर्षे ससाणे गटाला सभापतीपद तर मुरकुटे गटाला उपसभापतीपद, पुढील प्रत्येकी दीड वर्षे अनुक्रमे मुरकुटे गटाला व विखे गटाला सभापती पद व ससाणे गटाला उपसभापतीपद असे ठरल्याची चर्चा आहे.पण राजकारणात काहीच शाश्वत नसते. वेळेला जे आहे ते अंतिम असे समीकरण असते.सभापतीपदाच्या निवडीपूर्वी अनेक राजकीय डावपेचांना उधाण आले असून या पदासाठी इच्छूक असणार्या संचालकांची आपापल्या नेत्यांकडे मोर्चे बांधणी सुरू केले आहे.
मात्र युती नेत्यांची झाली असली तरी प्रमुख कार्यकर्त्यांचे मात्र मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे या पदावर आपला राजकीय शत्रू बसू नये यासाठी अनेकांनी वेगळीच फिल्डिंग सुरू केल्याने ज्यांची नावे या पदासाठी चर्चेत आहे. मात्र शेवटी अंतिम निर्णय पालकमंत्री विखे, माजी आमदार मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे घेतील हे नक्की.