गाळे लिलावात भाग घेण्यासाठी शेतकर्‍यांना सवलत

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय
गाळे लिलावात भाग घेण्यासाठी शेतकर्‍यांना सवलत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार आवारातील दुकान गाळे लिलाव कराराने वापरण्यास देण्याच्या प्रक्रियेतील अनामत रकमेत शेतकर्‍यांकडून आलेल्या लेखी मागणीनुसार शेतकर्‍यांसाठी सवलत देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारक यांच्यासाठी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलापूर येथील उपबाजार आवारातील सुमारे 32 गाळ्यांचा उद्या शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी दुपारी 2 वाजता जाहीर लिलावाद्वारे करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी बाजार समितीने एक लाख रुपयांची अनामत रक्कम म्हणून पूर्वी जाहीर केली होती. मात्र सदरची एक लाख रुपयांची अनामत रक्कम ही शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारक यांच्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. ती कमी करण्यात यावी, अशी मागणी या सर्वांनी लेखी अर्जाद्वारे केली होती. सदरची एक लाख रुपयांची अनामत रक्कम न घेता बाजार समितीने ती 50 हजार रुपये इतकीच घ्यावी,अशी मागणी शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारकांनी बाजार समितीकडे केली होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दीपक नागरगोजे यांनी शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारक यांच्याकडून आलेली लेखी सूचना मागणी मान्य केली असून उद्या लिलावात शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारक यांना 50 हजार रुपये भरून गाळ्यांच्या लिलावात सहभाग घेता येईल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार आवारातील सुमारे 32 गाळ्यांचा लिलाव उद्या होत असून यात शेतकरी व्यापारी तसेच परवानाधारकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही प्रशासक श्री. नागरगोजे व प्रभारी सचिव श्री. वाबळे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com