बाजार समितीच्या सभेत श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नावर आव्हान-प्रतीआव्हान

सत्तेत राहून जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर राजीनामा द्या - भोसले || राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल राजीनाम्याची तयारी - पटारे
श्रीरामपूर बाजार समिती
श्रीरामपूर बाजार समिती

श्रीरामपूर |तालुका प्रतिनिधी| Shrirampur

बाजार समितीच्या वार्षिक सभेत शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नावर भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांना सत्तेत असूनही जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे अप्रत्यक्षपणे सुचविताच त्याला पटारे यांनीही माझ्या राजीनाम्यामुळे जर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत असेल तर राजीनामा देण्याची आपली कधीही तयारी आहे, असे प्रतीआव्हान दिल्यामुळे या सभेत श्रीरामपूरकरांचा जिव्हाळ्याचा श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

या सभेत माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान शिवसेना नेते संजय छल्लारे यांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा, अशी मागणी केली. तर शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांनीही तीच मागणी पुढे करत थेट भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांच्याकडे निर्देश करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता नेत्यांचे निकटवर्तीय तसेच सत्तेत असूनही श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर पदावर न राहता राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

त्यावर दीपक पटारे यांनीही तात्काळ माईक हातात घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते व्यासपीठाकडे अंगुलीनिर्देश करीत म्हणाले की, राजीनामा द्यायचाच असेल माझ्यासह अनेकांनाही द्यावा लागेल. आणि माझ्यापुरते बोलायचे झाले तर केवळ माझ्या राजीनाम्यामुळे जिल्ह्याचा प्रश्न सुटणार असेल तर मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. मुळात सरकारच्या अजेंड्यावर जिल्हा विभाजनाचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे सध्या त्यावर बोलणे योग्य नाही. जेव्हा सरकार जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर निर्णय घेईल त्यावेळी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आपण सर्वजण संघटित ताकदीने एकत्र उभे राहू, अशी ग्वाहीही पटारे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रामराज्यात तरी श्रीरामपूरकरांना न्यायाची अपेक्षा

एकूणच श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नावर श्रीरामपूरकर नागरिक हे संवेदनशील असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर ऐवजी शिर्डीला सुरु केले. त्यामुळे ते एक येथून तिकडे जिल्हा नेण्याचे पहिले पाऊल तर नाही ना? अशी लोकांमध्ये नेहमीच कुजबुज आहे. त्यामुळे शासन दरबारी चाळीस वर्षांपासून गुणवत्तेच्या आधारावर प्रस्तावित जिल्ह्याचे ठिकाण म्हणून असलेल्या श्रीरामपूरचे नाव डावलले जाण्याची भीती लोकांच्या मनात असल्याचे यावेळी अनेकांच्या चर्चेतून स्पष्टपणे जाणवले. आतापर्यंत केवळ राजकीय इच्छाशक्ती, श्रेयवाद यामुळेच हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या समर्थ नेतृत्वाखालील रामराज्यात तरी श्रीरामांचे नाव असलेल्या श्रीरामपूरला न्याय मिळण्याची अपेक्षा समस्त श्रीरामपूरकरांना आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com