
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
येत्या 30 एप्रिल रोजी होत असलेल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील-माजी आ. भानुदास मुरकुटे व माजी नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या युतीवर काल रात्री उशिरा मुंबईत झालेल्या बैठकीत अखेर शिक्कामोर्तब झाले. जागा वाटप आज सायंकाळपर्यंत निश्चीत होणार आहे.
या निवडणुकीसाठी काँग्रेसचे आ. लहू कानडे-राष्ट्रवादीचे अविनाश आदिक-उध्दव ठाकरे गट व शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या विरोधात अचानक ना. विखे-मुरकुटे व ससाणे यांचीही युतीची चर्चा सुरू झाली. याबाबतचे वृत्त दैनिक सार्वमतने 1 एप्रिलच्या अंकात प्रसिध्द केले. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही विखे व ससाणे समर्थकांनी ठामपणे असे होऊ शकत नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढणार असे ठणकावून सांगितले होते. मात्र ‘राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही’ हे काल झालेल्या विखे-मुरकुटे-ससाणे गटाच्या युतीने सिध्द करून दाखविले आहे.
काल रात्री महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील ‘रॉयल स्टोन’ या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तब झाले. जागा वाटपात कोणताही वाद न करता एकदिलाने ही निवडणूक लढवून जिंकायची असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी सभापती व भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, गिरीधर आसने आदी उपस्थित होत.
बाजार समितीसाठी आ. लहू कानडे यांच्या महाविकास आघाडी विरुध्द ना. विखे-मुरकुटे-ससाणे यांची युती लढणार हे आता निश्चित झाले आहे. जागा वाटपाचा निर्णय आज सायंकाळपर्यंत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 20 एप्रिल असून त्या दिवशीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षाचे राजकारण न करता बाजार समितीच्या आणि तालुक्याच्या भल्यासाठी सर्वांनी राजकीय संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवा या दृष्टीकोनातून निवडणूक लढविली गेली पाहिजे या विचारातून ही ना. विखे-मुरकुटे व ससाणे गटाची युती झाल्याचे सांगण्यात येते.