
श्रीरामपूर |अशोक गाडेकर| Shrirampur
अवघ्या महिनाभरापूर्वी श्रीरामपूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली विखे-मुरकुटे-ससाणे गटाच्या ‘अजब’ युतीला काल झालेल्या सभापतीपदाच्या निवडीत तडा गेला. या युतीच्या वेळी ठरलेला फार्मूला डावलून विखे गटाने ऐनवेळी भूमिका बदलली. त्यात मुरकुटे गटाने यापूर्वी अशोक साखर कारखाना निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या मुरकुटे-ससाणे युतीचा धर्म न पाळल्याने आता या युतीबाबतही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीरामपूरचे राजकारण हे नेहमी मुरकुटे, आदिक, ससाणे गटाच्या भोवती फिरते आहे. त्यात विखे गटाची भूमिका महत्वाची ठरत आली आहे. विखे गटाने कधी आदिकांना, कधी ससाणेंना तर कधी मुरकुटेंना त्यांच्या विरोधकांच्या विरोधात लढण्यासाठी ताकद दिली. केवळ ताकदच नाही तर ‘रसद’ही पुरविली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली विखे-मुरकुटे-ससाणे ही ‘अजब युती’ सर्वांना संभ्रमात टाकणारी ठरली. मात्र राजकारणातील एक वेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहिले जात होते. अवघ्या महिनाभरापूर्वी म्हणजे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही युती सत्ता स्थापनेपर्यंतही टिकू शकली नाही.
श्रीरामपूर बाजार समितीची निवडणूक विखे-मुरकुटे-ससाणे युतीने एकत्रीत लढवून 18 पैकी 17 जागा जिंकून मोठा विजय मिळविला. त्यात एका अपक्षाने बाजी मारली तोही ना. विखे यांना मानणारा आहे. या विजयामुळे बाजार समिती सभापती व उपसभापती निवडी बिनविरोध होतील, असे वाटत असताना ऐनवेळी ना. राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक व लोणीचे जावई गिरीधर आसने यांचे नाव सभापतीपदासाठी पुढे करण्यात आले. त्यामुळे विखे गटाचे गिरीधर आसने व ससाणे गटाचे सुधीर नवले सभापतीपदासाठी आमने-सामने ठाकले. यावेळी ससाणे गटाने माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याशी असलेल्या युतीच्या हक्काने मदत मागितली. मात्र तुम्ही ऐकमेकांशी ‘कॉम्प्रमाईज’ करा, असा सल्ला देवून त्यांनी मदत करण्यास नकार दिला.
या निवडणुकीत वाद नको म्हणून आपण तटस्थ राहत असल्याचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी सांगितले असले तरी विखे व मुरकुटे यांनी ससाणेंना कोंडीत पकडण्यासाठी टाकलेला हा ‘डाव’ होता अशी भावना ससाणे गटाची झाल्याने अशोक कारखाना निवडणुकीच्या तोंडावर झालेली मुरकुटे-ससाणे युती संशयाच्या भोवर्यात सापडली आहे.
या सभापतीपदाच्या निवडीत मुरकुटे यांनी घेतलेली भूमिका ससाणे गटास अडचणीत टाकणारी ठरल्याने ससाणे समर्थकांनी संताप व्यक्त करून मुरकुटेंशी असलेली ‘युती’ तात्काळ तोडून टाकण्यासाठी त्यांचे नेते करण ससाणे यांना गळ घातली. दरम्यान, विखे गटाचा एक संचालक फोडण्याची ससाणे गटाने केलेली खेळी यशस्वी झाल्यानंतर ‘ईश्वरी’ चिठ्ठीने साथ दिली. त्यामुळे सुधीर नवले यांच्या रुपाने ससाणे गटाला सभापतीपद मिळाल्याच्या आनंदात तूर्त ही घोषणा लांबणीवर पडली आहे.