
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजअखेर सोसायटी, ग्रामपंचायत आणि व्यापारी अशा तिन्ही मतदार संघातून 11 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. गुरुवार दि. 20 एप्रिल अर्ज माघारीची अंतिम मुदत असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण 230 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आजअखेर सोसायटी मतदार संघातून प्रकाश थोरात, विजय सदाफळ, मंजुषा ढोकचौळे, विठ्ठल राऊत, अनिता कालंगडे तर ग्रामपंचायत मतदार संघातून अतुल खरात, ताजखा पठाण, मंजुषा ढोकचौळे आणि व्यापारी मतदार संघातून रियाज हबीब खान इलाही बक्ष शेख, शब्बीर खाटीक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
त्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आ. भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, आ. लहू कानडे, शिवसेनेचे अशोक थोरे व सचिन बडदे याशिवाय शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अजित काळे व जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांचे अर्ज भरून ठेवले आहेत.
या निवडणुकीत विखे-मुरकुटे-ससाणे एकत्र येण्याची चिन्हे आहेत. तर विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शेतकरी संघटना यांच्यासह इतरही काही समविचारी संघटनेचे पदाधिकारी अशी आघाडीची शक्यता आहे. दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी कोणी युती केल्यास कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ससाणे यांनी विखे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पटोले यांच्या इशार्यानंतर येथे काँग्रेस अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
खा. डॉ. सुजय विखे यांनी जनसेवा कार्यालयात राहाता, श्रीरामपूर व संगमनेर येथील भाजपा कार्यकर्त्यांची मॅरेथॉन बैठक घेत युती करण्याबरोबरच भरलेले अर्ज कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. आ. लहू कानडे जपान दौर्यावर आहेत. त्यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात अंकुश कानडे यांनी आज बैठक घेतली. ते उद्या भूमिका जाहीर करणार आहेत.