श्रीरामपूर बाजार समिती
श्रीरामपूर बाजार समिती

श्रीरामपूर बाजार समितीच्या 18 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात

विखे-मुरकुटे-ससाणे विरोधात आ. कानडे-आदिक-शेतकरी संघटना व शिवसेना यांच्यात लढत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी काल गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 186 अर्ज मागे घेण्यात आले. त्यानंतर आता संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची युती होऊन श्रीरामपूर सहकार विकास पॅनल तर विरोधी आ. लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. अजित काळे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिन बडधे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास आघाडी यांच्या लढत होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 30 एप्रिल 2023 रोजी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी एकूण 239 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 9 अर्ज बाद होऊन 230 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. त्यातील काल अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 186 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता दोन पॅनलचे मिळून 36 व 8 अपक्ष असे एकूण 44 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी विखे-मुरकुटे-ससाणे युतीच्या श्रीरामपूर सहकार विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण जागेसाठी किशोर बनसोडे, सोन्याबापू शिंदे (मुरकुटे), सचिन गुजर, सुधीर नवले, खंडेराव सदाफळ (ससाणे), नानासाहेब पवार, गिरीधर आसने (विखे), महिला राखीवमधून विद्या दाभाडे (ससाणे), सरला बडाख (विखे), इतर मागास प्रवर्गातून राजेंद्र पाऊलबुद्धे (ससाणे), भटक्या जाती-जमाती प्रवर्गातून दशरथ पिसे (मुरकुटे), ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण जागेसाठी मयूर पटारे (मुरकुटे), सुनील (नाना) शिंदे (विखे), अनु. जाती जमातीमधून राजू चक्रनारायण (ससाणे), आर्थिक दुर्बल घटकातून अभिषेक खंडागळे (विखे), व्यापारी मतदार संघातून रोहित कोठारी (ससाणे), जितेंद्र गदिया (विखे), हमाल मापाडीमधून दीपक हिवराळे (विखे-मुरकुटे-ससाणे सहमतीने) यांचा समावेश आहे.

त्याप्रमाणे विरोधी महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे -

कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण जागेसाठी अ‍ॅड.अजित बबनराव काळे, युवराज भाऊसाहेब जगताप, अनिल प्रभाकर औताडे, अशोक भोसले, सचिन जगताप, नामदेवराव आदिक व कैलास बोर्डे. महिला राखीवमधून मनीषा संजय वमने व शितल कवडे. इतर मागासवर्गीयमधून किशोर पाटील बकाल व भटक्या जाती विमुक्त जातीमधून साहेबराव हळनोर. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेसाठी संदीप चोरगे व आबा पवार, अनुसूचित जाती जमातीमधून प्रभाकर कारभारी कांबळे, आर्थिक दुर्बल घटकमधून ज्ञानेश्वर वाडितके, व्यापारी-आडते मतदारसंघातून अजय डाकले व शोभा विलास शेटे आणि हमाल मापाडी मतदार संघातून नवनाथ किसन सलालकर याचा समावेश आहे.

याशिवाय 8 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इतर मागास प्रवर्गातून नितीन रामदास पटारे, व्यापारी व आडते मतदार संघातून किशोर कालंगडे, नितीन ललवाणी, हमीद शेख व रमेश सोनवणे आणि हमाल मापाडी मतदार संघातून कचरु कराळे, पारुबाई रोकडे व संतोष येसेकर या आठ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज माघारीचा काल शेवटचा दिवस असल्याने अखेरपर्यंत कोणाची उमेदवारी निश्चित होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी तीन वाजेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. 30 एप्रिलला मतदान होणार असल्याने प्रचारासाठी अवघे 10 दिवस आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मतदान व मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com