श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात

श्रीरामपूर बाजार समिती
श्रीरामपूर बाजार समिती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काल काँग्रेस, राष्ट्रवादी , उध्दव ठाकरे शिवसेना व शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन बैठक घेत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर कोण उभे ठाकणार याची उत्सुकता लागली आहे. ससाणे गटाने याकडे पाठ फिरवली तर विखे व मुरकुटे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 30 एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दाखल झाली असली तरी पहिल्या दिवशी 27 मार्च रोजी 15 अर्जांची विक्री झाली होती तर काल मंगळवार दि. 28 मार्च रोजी 79 अर्जांची विक्री होऊन दोन दिवसांत 94 अर्जांची विक्री झाली असली तर दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. काल आ. कानडे यांनी त्यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे गट शिवसेना, व शेतकरी संघटना यांना एकत्रित करत बैठक बोलावली होती.

या बैठकीस काँग्रेसच्यावतीने आ. लहू कानडे, अशोक कानडे, इंद्रनाथ थोरात, अरुण पा. नाईक, विष्णूपंत खंडागळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, कैलास बोर्डे, शिवसेनेचे अशोक थोरे, अरुण पाटील, सचिन बडधे, शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, सुरेश ताके, अनिल औताडे,जगताप, किशोर बकाल,कलीम कुरेशी, रज्जाक पठाण, असलम शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ. कानडे यांनी सांगितले की, वरिल पातळीवर सध्या महाविकास आघाडी म्हणून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने त्या पार्श्वभीमूवर आज तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी संघटना यांना एकत्रित करुन बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी लागणार असल्याचे सांगितले. यावर सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने महाविकास आघाडी तयार होऊन या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेणार असल्याचे चित्र दिसले. वरिल पातळीवर सर्वच पक्षांनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावून त्यांना महाविकास आघाडीच्यावतीने या निवडणुका लढविण्याचे संकेत दिले होते त्यानुसार काल याबाबत प्राथमिक बैठक झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे अविनाश आदिक यांनीही सांगितले की, यापुढील सर्व निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचे शरद पवार यांनी सांगितले असल्याने आपण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.

ससाणे गटाची भूमिका अद्याप अस्पष्टच

श्रीरामपूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत ससाणे यांना विचारले असता अद्याप आपण काहीच निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आम्ही एकत्रित निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र काल काँग्रेस म्हणून जी बाजार समितीबाबत बैठक आ. लहू कानडे यांनी बोलावली होती त्याकडे त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. मुरकुटे यांच्या बरोबर युती करून निवडणूक लढवितात की, स्वतंत्रपणे लढतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com