श्रीरामपूर बाजार समिती वाद निवडणूक प्राधिकरण आयुक्तांकडे दाद

श्रीरामपूर बाजार समिती
श्रीरामपूर बाजार समिती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनानुसार सोमवार दि. 14 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. त्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो असता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसल्याचे तसेच अर्ज स्विकृतीबाबतही काहीही कार्यवाही सुरू केली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर यांनी थेट राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त यांच्याकडे तक्रार करून दाद मागितली आहे.

सहकार आयुक्त यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत गुजर यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022-23 ते 2027-28 करिता उच्च न्यायालयाने याचिका क्र. 11669/2021 मध्ये आदेश पारित करुन निवडणुकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका तातडीने पूर्ण करुन तद्नंतर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरु करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार आपल्या कार्यालयाने श्रीरामपूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीची अंतिम मतदार यादी व संभाव्य निवडणूक कार्यक्रम वरील पत्रान्वये जिल्हा निवडणूक अधिकारी, (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जि. अहमदनगर यांना कळविले होते.

त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांनी अंतिम मतदारांची 4 नोव्हेंबर 2022 रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. आपल्या कार्यालयाच्या वरील संदर्भीय पत्रानुसार आज सोमवार दि. 14 नोव्हेंबर 2022 नुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, नामनिर्देशन स्विकृत करणे गरजेचे होते. परंतू निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही. तसेच अर्ज स्विकृतीबाबतही काहीही कार्यवाही सुरु केलेली नाही. आपण आज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, श्रीरामपूर यांच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी आलो असता येथे अर्ज स्वीकृतीबाबत काहीही कार्यवाही सुरु नव्हती.

श्रीरामपूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीची निवडणूक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत घेण्याचे आदेश असताना तसेच उच्च न्यायालयाचा निवडणूक कार्यक्रमास स्थगिती नसताना निवडणूक कार्यक्रम का थांबविला? यात उच्च न्यायालयाचा अवमान होत नाही का? याची लेखी माहिती मिळावी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी मागणी गुजर यांनी सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तांकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com