श्रीरामपूर बाजार समितीने वाटप केलेल्या भुखंडावरील बांधकाम तात्काळ थांबवावे

सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकांनी दिले निर्देश
श्रीरामपूर बाजार समितीने वाटप केलेल्या भुखंडावरील बांधकाम तात्काळ थांबवावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन संचालकांची परवानगी न घेता मंजूर ले-आऊटमध्ये बदल करून 22 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या

संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव क्र. 5 नुसार कांदा आडत व्यापार्‍यांना भूखंड वाटप करून सदरील जागेवर सुरू केलेले बांधकाम तात्काळ थांबविण्यात येत असल्याचे निर्देश सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक वि. उ. लकवाल यांनी दिले आहेत.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने येथे चार ते पाच कांदा व्यापार्‍यांना बाजार समितीची मोक्याची जागा पणन संचालकांची परवानगी न घेता परस्पर बेकायदेशीर वितरीत केली असून संबंधित व्यापार्‍यांनी त्या ठिकाणी नकाशे मंजूर न करता काम सुरू केले असून याबाबत कारवाई करण्यात यावी अशी तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन रंगराव गुजर यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली होती.

त्यानुसार सहाय्यक निबंधक यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी समक्ष भेट देऊन दप्तर तपासणी केली असता बाजार समितीने 10 ऑगस्ट 2020 रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्र. 17 नुसार काही कांदा आडते व्यापार्‍यांनी भुखंडाची मागणी केली असता त्यानुसार अशा आडतव्यापार्‍यांची यादी तयार करून मागणी अर्जाचा ठराव मंजूर करण्यात आला.

त्यानंतर 22 सप्टेंबर 2020 रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्र. 5 नुसार 6 अर्जांचा विचार करून या आडत व्यापार्‍यांना कांदा मार्केटच्या पूर्वेकडील रिकाम्या जागेत 11 महिन्यांच्या कराराने भुखंड वाटपाचा ठराव करण्यात आला. परंतु बाजार समितीने सदरचा प्लॉट कांदा आडत व्यापार्‍यांना फेरबदलासाठी मंजुरी न घेता 8900 चौ. मी. मोकळ्या जागेचे वाटप करून त्याठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम केले असल्याचे निर्दशनास आले आहे.

मुख्य बाजार आवाराच्या सुधारीत विकास आराखड्यात पणन संचालक यांची मान्यता न घेता फेरबदल केला आहे. त्याप्रमाणे मंजुरी न घेता मोकळे प्लॉट वाटप केले असल्याची खात्री झाली असल्याची माहिती सहाय्यक निबंधक वि. उ. लकवाल यांनी दिली.

कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 40 (ई) नुसार पाप्त झालेल्या अधिकारानुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन संचालकांची परवानगी न घेता मंजूर ले-आऊटमध्ये बदल करून 22 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव क्र. 5 नुसार कांदा आडत व्यापार्‍यांना भुखंड वाटप करून सदरील जागेवर सुरू केलेले बांधकाम तात्काळ थांबविण्यात येत असल्याचे निर्देश सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक वि. उ. लकवाल यांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com