श्रीरामपूर बाजार समितीत ‘योगायोग’

सभापती-उपसभापती आणि प्र. सचिव बेलापूरचेच
श्रीरामपूर बाजार समिती
श्रीरामपूर बाजार समिती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड नाट्यमयरित्या झाली. बाजार समितीच्या सभापतीपदी ससाणे गटाचे बेलापूर सेवा सोसायटीचे चेअरमन सुधीर वेणूनाथ नवले यांची ईश्वर चिठ्ठीने तर उपसभापतीपदी ना. राधाकृष्ण विखे गटाचे बेलापूरचे उपसरपंच अभिषेक भास्करराव खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली. तालुक्याच्या व गावाच्या इतिहासात प्रथमच सभापती, उपसभापती व प्रभारी सचीव अशी एकाच वेळी तिन्ही पदाचा बहुमान बेलापूरला मिळाल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मागील महिन्यात झालेल्या निवडणुकीत ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. निवडणुकीत आ. लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, शेतकरी संघटना व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या आघाडीचा दारूण पराभव झाला होता. बाजार समितीत ना. विखे गट 7, ससाणे गट 6 तर मुरकुटे गट 4 व 1 अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार किशोर कालंगडे विजयी झाल्याने ससाणे गटाची एक जागा कमी झाली.

निवडणूक निकालानंतर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत पहिली दोन वर्षे ससाणे गटाला व नंतरची दीड-दीड वर्षे विखे आणि मुरकुटे गटाला सभापतीपद आणि उपसभापती पद आलटून-पालटून देण्याचे ठरल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार प्रथम ज्येष्ठ संचालक सुधीर नवले यांच्या नावाची सभापती पदासाठी प्राधान्याने चर्चा होती. काल सकाळी खा. डॉ. सुजय विखे, माजी आ. भानुदास मुरकुटे आणि करण ससाणे यांच्यात निवडणुकीची व्युहरचना करण्यासाठी गुप्त बैठक झाली.

काल निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक दिपक नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती, उपसभापती निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वा. श्री. नागरगोजे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. यावेळी सभापती पदासाठी विखे गटाकडून गिरीधर आसने यांचा तर उपसभापती पदासाठी अभिषेक खंडागळे यांचा प्रत्येकी एक एक अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे पहिल्या बैठकीत ठरल्यानुसार आम्हाला संधी मिळावी, असे सांगत ससाणे गटाच्या संचालकांनी सभापतीपदाची मागणी केली. परंतु विखे गटाने त्यांची मागणी मान्य न केल्याने ससाणे गटाचे सुधीर वेणूनाथ नवले यांनी सभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पूर्वी झालेल्या चर्चेनुसार निवड करत नसल्याने मुरकुटे गटाने या निवडणुकीत अलीप्ततेची भूमिका घेत बहिष्कार टाकला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू होते. मात्र त्याला यश आले नाही. शेवटी निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक निर्यय अधिकारी श्री. नागरगोजे यांनी दिले. यावेळी हात उंच करून मतदान घ्यावे, अशी मागणी विखे गटाच्या संचालकांनी केली. त्यानुसार हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी विखे गटाकडे 7, ससाणे गटाकडे 6 तर अपक्ष 1 असे सदस्य यावेळी उपस्थित होते.

विखे गटाकडून गिरीधर आसने, अभिषेक खंडागळे, नानासाहेब पवार, सुनिल शिंदे, सरला बडाख, मनोज हिवराळे व अपक्ष किशोर कालंगडे अशी सात तर सुधीर नवले यांच्या बाजूने सुधीर नवले, सचिन गुजर, राजेंद्र पाऊलबुध्दे, खंडू सदाफळ, राजेंद्र चक्रनारायण व विखे गटाचे जितेंद्र गदिया अशी सात मते पडली. दोघांनाही समसमान मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नागरगोजे यांनी ‘ईश्वर चिठ्ठी’ काढण्याचा निर्णय घेत श्री. नवले व श्री. आसने या दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या.

येथील हमाल विनायक रोकडे यांची सहा वर्षाची मुलगी प्रतीक्षा रोकडे हिच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सुधीर वेणूनाथ नवले याची चिठ्ठी निघाल्याने सभापतीपदी सुधीर नवले यांची निवड झाली. उपसभापतीपदी विखे गटाकडून अभिषेक खंडागळे यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्याची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे बेलापूर गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती, उपसभापती अशी दोन्हीही पदे वेगवेगळ्या गटाकडून गावाला मिळाली आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशासक दीपक नागरगोजे, त्यांना सहायक म्हणून प्र. सचिव साहेबराव वाबळे, अनिल पुंड, वामन मोरगे, दत्तात्रय थोरात यांनी काम पाहिले.

निवडीनंतर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, बाजार समितीचे संचालक सचिन गुजर, नानासाहेब पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी सर्वांचे आभार मानले. यापुढे शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेवून काम करू, असे आश्वासन दिले. यावेळी ससाणे गटाकडून घोषणाबाजी झाल्यानंतर विखे गटाकडूनही घोषणाबाजी करण्यात आली.

निवडीनंतर सभापती नवले यांनी माजी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री ससाणे व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस करण ससाणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तर उपसभापती खंडागळे यांनी खा. डॉ. सुजय विखे व जि. प. चे माजी सभापती शरद नवले आदींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

दरम्यान, सभापतीपदी बेलापूर सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुधीर नवले व उपसभापती विद्यमान उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या निवडीबद्दल बेलापूर गावात त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून, गुलालाची उधळण, सवाद्य मिरवणूक आणि पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.

बेलापूरला 71 वर्षांनी सभापती पदाची माळ

दैनिक सार्वमतने गुरुवारच्या अंकात मार्केट कमेटीच्या स्थापनेनंतर तालुक्यातील सर्वात मोठ्या व राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या बेलापूर गावाला एकाहत्तर वर्षात सभापती पद मिळाले नसल्याची नागरिक आणि व्यापार्‍यांची भावना मांडली होती. यंदाही नेत्यांनी हुलकावणी दिली होती. मात्र ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंदाच्या कृपेनें सभापतीपदाची माळ सुधीर नवले यांच्या गळ्यात पडुन गावाचे पहिले सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला.

एक दिवस तरी सभापतीपद द्या

बाजार समितीचे सभापतीपद ठरल्याप्रमाणे आम्हाला द्या, अशी मागणी करण ससाणे यांनी ना. विखे व खा. विखे यांच्याकडे केली होती. परंतू त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळल्याने शेवटी सुधीर नवले यांनी अर्ज भरला. मात्र अर्ज माघारीच्या शेवटी सुधीर नवले हे दीपक पटारे, नानासाहेब पवार, नाना शिंदे यांना भेटले. एक महिन्याकरीता मला सभापती करा, किमान एक आठवडा नाही तर एक दिवसासाठी तरी मला सभापती करा, पाहिजे तर मी आताच सर्वांसमक्ष पुढचा राजीनामा लिहून देतो, अशी मागणी केली. मात्र त्यांनीही दाद दिली नाही. शेवटी ईश्वर चिठ्ठीद्वारे सुधीर नवले यांची लॉटरी लागली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com