
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सन 2023-24 या वर्षाचा 14 कोटी 20 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असुन अर्थसंकल्पात अनेक विकास कामे हाती प्रस्तावित केली आहेत. प्रशासकाच्या कार्यकाळात बाजार समीतीचा नफा तसेच ठेवीतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समीतीने सन 2023-24 चा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडे सादर केला आहे. डिसेंबर 2021 अखेर सममितीला 5 लाख 83 हजार रुपये नफा होता तर डिसेंबर 2022 अखेर 45 लाख रुपये नफा झाला आहे तर ऑक्टोंबरपर्यत मुदत ठेवी 45 लाख होत्या. जानेवारी 2023 अखेर ठेवी 1 कोटी 20 लाख इतक्या झाल्या आहेत. प्रशासकांनी पुढील काळात अनेक विकास कामे प्रस्तावित केली असुन सीएनजी पंप उभारणी, जनावरांचा बाजार पूर्ववत चालु करणे, मोकळा कांदा खरेदीसाठी जमीन खरेदी करणे, बेलापूर उपबाजार आवारात 28 दुकानगाळे व 14 गोडावून असे 2 कोटी 50 लाख रुपयाचे काम प्रागतीपथावर आहे.
महाराष्ट्र शासनाकडून शेती महामंडळाच्या उर्वरीत 50 एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव प्रशासकांनी तयार केलेला आहे. तसेच श्रीरामपूर बाजार समितीतील मेनगेट ते कांदा मार्केटरोड काँक्रिटीकरणासाठी 12 लाख रुपये, कांदा मार्केटरोड काँंक्रीटीकरणासाठी 70 लाख, मुख्य बाजार समितीत शॉपींग सेंटरकरीता 2 कोटी 50 लाख, भाजीपाला मार्केट दुकानगाळे 40 लाख, बेलापूर उपबाजार शॉपींग सेंटर 1 कोटी 15 लाख, बेलापूर रोडअंतर्गत काँक्रीटीकरण 65 लाख, टाकळीभान उपबाजार रोड काँक्रीटीकरण 1 कोटी 10 लाख याप्रमाणे एकुण 7 कोटी 70 लाख रुपये खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.