घरगुती वीज बिले शासनाने माफ करावीत
सार्वमत

घरगुती वीज बिले शासनाने माफ करावीत

लोकसेवा विकास आघाडीची प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

राज्यातील दरमहा 300 युनिटच्या आत वीज वापर असलेल्या सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची तीन महिन्यांची वीज बिले माफ करण्यात यावीत व त्यासाठी आवश्यक त्या रकमेची भरपाई राज्य शासनाने महावितरण कंपनीस अनुदान स्वरुपात द्यावी, अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, लाल पटेल, भाऊसाहेब हळनोर, नाना पाटील, अभिषेक खंडागळे, गणेश भाकरे, आदिनाथ झुराळे, प्रकाश नवले, प्रविण फरगडे, विजय मोरगे, प्रमोद करंडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी श्री. पवार यांनी आपले मागणीचे निवेदन शासनाकडे पाठविले जाईल, असे सांगितले.

या निवेदनात म्हटले आहे की, वीज बिल माफीसाठी दि.13 जुलै रोजी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये सदरचे आंदोलन झाल्यानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलामध्ये 20 ते 30 टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले होते. परंतू सदरची तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही तर उलट आजच्या कोरोना सदृष्य स्थितीत त्यांच्या अडीचणीवर आणि दु:खावर मीठ चोळणारी आहे.

राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त वीज ग्राहकांची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण वीज बिले माफी करावीत, अशी ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती हालाखिची असल्याने सदरचे तीन महिन्यांची वीज बिले ग्राहक भरणार नाहीत. तसेच राज्याचे उर्जामंत्री यांनी जाहीर केलेल्या 100 युनिटच्या आतील वीज ग्राहकांना मोफत वीज या घोषणेची त्वरीत अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

याबाबत राज्यातील घरगुती वीज ग्राहकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना मोठ्या प्रमाणात ई-मेल आणि पत्र पाठवून संपूर्ण वीज बिल माफीची मागणी करावी, त्याचबरोबर दि.15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाल्यास राज्यातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये वीज बिल माफीचे ठराव करावेत व ठरावांच्या प्रती राज्य सरकारकडे पाठवाव्यात, असे आवाहनही लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

या निवेदनावर सर्वश्री अ‍ॅड्.सुभाष चौधरी, अ‍ॅड्.उमेश लटमाळे, सोपानराव नाईक, दत्तात्रय कांदे, संकेत संचेती, ज्ञानेश्वर नानेकर, विष्णू मोढे, आण्णासाहेब गारडे, पत्रकार सुरेश कांगुणे, संजय मोरगे आदींच्या सह्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com