टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका शिवसेना प्रमुख दादासाहेब कोकणे यांनी दिली.

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या टप्प्यात मुदत संपलेल्या 27 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबाबत शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, उपतालुका प्रमुख प्रदीप वाघ व ज्येष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांच्याशी संवाद साधला असता कोकणे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले असल्याने अनेक समाजहिताचे निर्णय घेतले जात आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी हिताचे अनेक निर्णय होत आहेत. शिवसेना पक्षावर ग्रामिण जनता अत्यंत खुश आहे.

ग्रामीण भागात शिवसेना पक्षाची ताकद त्यामुळे वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी ग्रामीण भागात शिवसेनेची सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

त्यामुळे शिवसेनाही या निवडणुकांपासून दूर न राहता तालुक्यातील सर्व 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. अनेक गावांत शिवसेनेचे बळ चांगले वाढलेले आहे. ग्रामीण भागाच्या व्यापक हितासाठी व सर्वंकष विकासासाठी शिवसेना पक्ष कटीबध्द असल्याने निवडणूक होत असलेल्या सर्व गावांत शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार आहे, असे कोकणे म्हणाले.

तालुक्यातील कार्यकर्त्यांचे याबाबत मत जाणून घेण्यासाठी लवकरच एक बैठक घेणार असून खा. सदाशिव लोखंडे यांचीही याबाबत भेट घेऊन माहिती देणार असल्याचेही कोकणे यांनी यावेळी स्पष्ट केले.