
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील सहा ग्रामंचायतींच्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी सदस्यपदासाठी केवळ 26 उमेदवारी अर्ज तर सहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी फक्त 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन सेवा बंद असल्यामुळे काल उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच वेळही वाढून मिळाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुुक, वांगी खुर्द, कमालपूर, माळेवाडी, उंबरगाव व खंडाळा या सहा ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 28 नोव्हेंबर 2022 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून निवडणूक आयोगाची वेबसाईड चालू नसल्यामुळे पहिले तीन दिवस निरंकच गेल्याने एकही उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण आल्यामुळे ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येत आहेत. काल चौथ्या दिवशी श्रीरामपूर तहसील कार्यालयात ऑफलाईन अर्ज स्विकारले असता वांगी बुद्रुक येथे सदस्यपदासाठी 2 तर सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल नव्हता.
वागी खुर्द येथे सदस्यपदासाठी 2 तर या ठिकाणीही सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल नव्हता. कमालपूर येथे सदस्यपदासाठी 5 तर सरपंचपदासाठी 1 असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. माळेवाडी याठिकाणी सदस्यपदासाठी केवळ 1 उमेदवारी अर्ज दाखल असून सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. उंबरगाव ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 11 तर सरपंचपदासाठी 2 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
तर खंडाळा याठिकाणी सदस्यदासाठी केवळ 5 तर सरपंचपदासाठी 1 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. याप्रकारे सहा ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी केवळ 4 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर सदस्यपदासाठी केवळ 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शुक्रवार दि. 2 डिसेंबर 2022 हा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलच्या आवारात झुंंबड उडणार आहे.