श्रीरामपूर : तिघांना 8 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुसेसह पकडले
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील हॉटेल राधिकाचे पार्किंगजवळ गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना काल अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. या तिघांकडून पोलिसांनी 8 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुस हस्तगत केले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.
महाराष्ट्र विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दि.16 ते 30 जून 2022 या कालावधी दरम्यान अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाबत विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके हे अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्र व हत्यारेबाबत माहिती घेत असतांना पोलीस निरीक्षक श्री. कटके यांना माहिती मिळाली की, दाढी वाढलेले तीनजण हे गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी श्रीरामपूर येथील हॉटेल राधिकाचे पार्किंगजवळ येणार आहे. श्री कटके यांनी मिळालेल्या माहितीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, स.फौ. राजेंद्र वाघ, स.फौ. संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, शंकर चौधरी, सुरेश माळी, रवि सोनटक्के, पोकॉ मयुर गायकवाड, सागर ससाणे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने श्रीरामपूर येथील हॉटेल राधिकाच्या पार्किंग जवळ सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात हॉटेल राधिकाच्या गाड्यांचे पार्किंगकडे दाढी वाढलेले तीन इसम आजुबाजूला संशयीतरित्या टेहळणी करत पायी येतांना दिसले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीतांना घेराव घालून ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना संशयितांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळू लागले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीतांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत तिघांनी त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी राहुलसिंग फत्तुसिंग कलानी (वय 25), आकाशसिंग बादलसिंग जुनी (वय 22), अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (वय 22) सर्व रा. श्रीरामपुर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड नं. 3, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. त्याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांची अंगझडती घेवून 8 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुसे असा एकूण 2 लाख 45 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तो जप्त करण्यात आला. पुढील कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर, श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांच्या पथकाने केली आहे.