श्रीरामपुरातील गणेश मंडळाच्या हजारो रुपयांवरून वादंग

अनेकांनी घेतल्या हरकती; मंडळ पदाधिकारी मूग गिळून
श्रीरामपुरातील गणेश मंडळाच्या हजारो रुपयांवरून वादंग

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील एका प्रसिध्द गणेशोत्सव मंडळात 45 हजार रुपयांचे काय? त्यावरून चांगलेच वादंग झाले. सदरचे पैसे गेले कुठे? असा प्रश्न अनेकांनी विचारला. यावर मंडळाचे काही पदाधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत. सदरचे पैसे कुठे आहे हे काहींना माहीत आहे परंतु ते मूग गिळून आहेत. त्यामुळे या पैशाबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.

शहरातील बहुतेक गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी नसते तरीही वर्गणी गोळा केली जाते. त्यामुळे हिशोब पत्रके सादर केली जात नाहीत. करोना संसर्ग असल्यामुळे उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. असे असले तरी मंडळाकडे किती वर्गणी जमा झाली किंवा किती खर्च झाला याचा हिशोब सहसा कोणी पाहत नाही. अशाच एका गणेश मंडळाचा हिशोब काही जाणकार नागरिकांनी तपासला असता मंडळाच्या विश्वस्त मंडळाला विश्वासात न घेता अथवा तसा ठराव न करता 45 हजार रुपये एका मंदिराच्या नावावर काढण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मंडळाच्या खात्यात ही रक्कम भरा, असा आग्रह करण्यात आला. पण ही रक्कम भरण्यास नकार दिल्यास हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात जाण्याची शक्यता आहे.

या गणेशोत्सव मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे वर्गणीही मोठ्या प्रमाणावर जमा होत होती. मात्र गेल्या काही वर्षापासून या मंडळाने सार्वत्रिक कार्यक्रम बंद केले असल्यामुळे हे पैसे वाचले जात होते. त्यामुळे या मंडळाकडे मोठ्या प्रमाणावर शिल्लक होती. त्यातील 45 हजार रुपयांचा हिशोब लागत नसल्यामुळे सदरच्या पैशाबाबत विचारणा होऊन चौकशीही झाली. दोन दिवसांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने वर्गणी गोळा करताना या गणेश मंडळास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com