भीषण अपघात; नायगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रस्त्यावरील खड्डे व अतिक्रमणाचे बळी । श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील घटना
भीषण अपघात; नायगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

श्रीरामपूर | प्रतिनिधी

शहरानजीक गायकवाड वस्ती या ठिकाणी मळीच्या टँकरखाली चिरडून नायगाव (ता. श्रीरामपूर) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. काल सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रस्त्यावरील खड्डे, रेंगाळलेले रुंदीकरणाचे काम व अतिक्रमण करून रस्त्यावर व्यवसाय थाटणार्‍यांमुळे तिघांचा बळी गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड (वय 50), अजित बाळासाहेब गायकवाड (वय 22) व दीपाली बाळासाहेब गायकवाड (वय 18) अशी या अपघातात ठार झालेल्याची नावे आहेत. ते सर्व तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी आहेत. बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड हे आपला मुलगा अजित व मुलगी दीपाली यांना घेवून त्यांच्या सीटी-100 क्र. एमएच 17 सीएन 7121 या मोटारसायकलवरुन पढेगाव येथील नातेवाईकांकडे महिन्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. शहरानजिकच गायकवाड वस्ती येथील अभिषेक मंगलकार्यालयासमोर बेलापूरकडून येणारी मोटारसायकल व गायकवाड यांची मोटारसायकल एकमेकांवर धडकली. त्यामुळे बाळासाहेब गायकवाड, त्यांची मुलगी दीपाली व मुलगा अजित मोटारसायकवरून खाली पडले.

त्याचवेळी पाठीमागून बेलापूरकडे जाणार्‍या मळीच्या टॅकरखाली (एमएच 43 यु 3335) येवून दीपाली चिरडून जागीच ठार झाली. तर वडील बाळासाहेब व मुलगा अजित गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी श्रीरामपुरातील साखर कामगार रुग्णालयात नेत असताना बाळासाहेब यांचा मृत्यू झाला. तर अजित यांच्यावर प्राथमिक उपचार करुन नगर येथील खाजगी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून टँकर बेलापूर पोलीस चौकीत आणला.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. बेलापूर पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह व जखमींना रुग्णवाहिकेतून साखर कामगार रुग्णालयात हलविले. दीपालीचा मृतदेह रुग्णाहिकेत घेत असताना विटांची वाहतूक करणार्‍या एका मालट्रकने रुग्णवाहिकेच्या दरवाजास धक्का मारुन काच फोडली. संतप्त जमावाने या मालट्रक चालकाची चांगलीच धुलाई केली.

अपघाताची माहिती वार्‍यासारखी पसरताच नाऊर, नायगाव परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात व घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी घटनस्थळी जावून पंचनामा केला. तसेच तिघांचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तिघांवर नायगावमध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड हे नायगाव येथील सुरेश ठोंबरे यांच्याकडे मोलमजुरीचे काम करत होते. तर त्यांचा मुलगा हा श्रीरामपूर येथील फर्निचर मॉलमध्ये काम करत होता. मयत दीपाली ही आरबीएनबी महाविद्यालयात 12 वी मध्ये शिक्षण घेत होती. दीपाली शिक्षणाबरोबरच आईसमवेत मोलमजुरीचे काम करत होती. बाळासाहेब गायकवाड यांना पत्नी, चार मुली व एक मुलगा असा परिवार होता. तीन मुलींचे विवाह झाले आहेत. अपघातात ठार झालेले दीपाली व अजित हे अविवाहित होते. एका मुलीच्या सासर्‍यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या महिन्यासाठी ते तिघे पढेगावला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवा

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या कडेला अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांची वाहने रस्त्याच्या लगत उभी असतात. रस्त्याचे रुंदीकरणाचे काम काही दिवसांपासून रेंगाळले आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणे आणि रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. कालचा अपघातही या दोन कारणांमुळेच झाला. एकाच कुटुंबातील तीन जणांचे बळी प्रशासनाच्या बेजबादारपणामुळे गेले आहेत. रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवावेत. तसेच रस्त्यालगत अतिक्रमण करुन व्यवसाय करणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुढे आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com