श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणाबाबत प्रशासन सुस्त

अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी प्रशासक व मुख्याधिकार्‍यांचे आदेश मानत नाहीत हेच दुर्दैव
श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणाबाबत प्रशासन सुस्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नागरिकांनी तक्रारी करूनही श्रीरामपूर नगरपालिकेने अतिक्रमण काढणे तर सोडा, रस्त्यावरील अतिक्रमित जागेवरील साधा बोर्ड उचलला नाही, तर पोलिसांनी वाहतुकीला अडथळा करणार्‍या बेशिस्त वाहने, हातगाड्यावर सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही. यातून प्रशासनाचा निष्काळजीपणा नागरिकांना दिसून येत आहे. प्रशासन याबाबत सुस्त झालेले असून पालिका प्रशासक व मुख्याधिकार्‍यांचा कोणताही आदेश अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी मानत नसून ही दुर्दैवी बाब आहे.

नागरिकांना नागरी सुविधा, सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. याची कबुली स्वतः मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी दिली होती, परंतु स्वच्छतेचे अनेक बक्षिस मिळविणार्‍या नगर पालिकेला नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छतेची काळजी वाटत नाही. सुदैवाने अजून कावीळ, मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीचे आजार झालेले नाहीत. नगर पालिका कोणती साथ येण्याची वाट पाहते काय? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

मोकाट कुत्रे, मोकाट जनावरांनी प्रमूख रस्त्याचा जणू ताबाच घेतला आहे. जनावरांचा मुक्त संचार शहरातून दररोज असतो, शाळा सुरू झालेल्या आहेत. दररोज लहान मुले पायी, सायकलवरून शाळेत जातात. मुलांना कुत्रे चावण्याची भीती वाटत असल्याने शाळेत जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्याचा बंदोबस्त अनेक वर्षांपासून होऊ शकला नाही. शहरातून जाणार्‍या दोन कालव्याची कचरा कुंडी, गटार झालेली आहे. त्यावर नगर पालिकेला अजून उपाय सापडलेला नाही. अनेकांनी कालव्यामध्ये ड्रेनेजचे पाईप सोडलेले आहेत, याच कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या तलावात पाणी सोडले जाते. तालुक्यातील काही गावाच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. कॅनॉलच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. पाटबंधारे खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे.

शहरातील रस्त्यावर झालेले अतिक्रमणे, रस्त्यावर लावलेले बोर्ड यामुळे भव्य दिव्य दिसणारा रस्ता गल्लीबोळा सारखा झालेला आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही नगर पालिका बघ्यायची भूमिका घेत आहे. श्रीरामपूरकरांचे हे मोठे दुर्दैव आहे.

नगरपालिका आणि पोलीस एकाच माळेचे मणी. पोलीस अधिकार्‍याना एखादी तक्रार सांगितली तर त्यावर त्यांचे मनोगत ऐकावे लागते. मला माहित नाही, मी माहिती घेतो, मग सांगतो, आपल्याला कळवतो अशा प्रकारची उत्तरे नाजूक शब्दातून ऐकावे लागते. साहेब, पोलीस स्टेशन सोडू नका, बाहेरच आम्ही संभाळून घेतो, असा सल्ला देणारे पोलीस कर्मचारी सुद्धा श्रीरामपूर येथे आहे.

रस्त्यात उभ्या राहणार्‍या वाहनावर वाहतूक पोलिसानी कारवाई करण्याऐवजी एस टी स्टँड समोर थांबून गोरगरीब वाहन चालक कडून सक्तीची वसुली करतात. परंतु प्रमुख रस्त्यावर बेशिस्तीत उभ्या राहणार्‍या वाहनांसह हातगाड्यावर कारवाई झाल्याचे दिसत नाही. उलट वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची सोय नाही, त्यांनी कुठे वाहने लावयचे, असा प्रतिप्रश्न वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याकडून केला जातो. मटका, गुटखा, जुगार, वाळू आशा अवैध धंदे करणार्‍या व गुन्हेगारांना सद्या सुगीचे दिवस आलेले आहेत.

एकंदर सरकारी अधिकारी तर सोडाच साध्या कर्मचार्‍यालाही कोणाचाही धाक राहिलेला नाही. वरिष्ठांना सुद्धा जुमानात नाही. नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा, उत्सव काळातील मेन रोडवर लागणारे स्टॉल, जैन स्थानकाच्या बांधकामाविषयी अमित मुथा यांनी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे. मुथा यांनी मुख्याधिकार्‍यापासूनच राज्यपालापर्यंत न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला परंतु अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. श्रीरामपूर मुक्कामी आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हा प्रश्न इतके वर्ष प्रलंबित का? असा प्रश्न उपस्थित करूनही याचे उत्तरही अद्याप सापडू शकेलेले नाही.

नळांना दहा दिवसापासून गटारीचे पाणी

पालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावात नेहमीच कचर्‍याचा थर साचलेला असतो. याच तलावात मध्यंतरी मेलेली जनावरे, माणसांचे मृतदेह सापडले होते. फिल्टर करुन हेच पाणी नागरीकाना दररोज पुरविले जाते. वॉर्ड नं. 2 मधील सय्यद बाबा दर्ग्याच्या मागील भागात गटारीचे पाणी नळांना पिण्यासाठी येत येत आहे. अनेक दिवसापासून या घाण पाण्याचे लिकेज कुठे आहे हेच सापडत नसल्याने या भागातील नागरिकांना दुर्दैवाने गेल्या दहा दिवसापासून याच पाण्याचा वापर करावा लागत आहे. साठवण तलावाजवळी सुरक्षेच्या दृष्टीने अजून कुठलीही व्यवस्था झालेली नाही. या सर्व गोष्टीला पालिकेचा बेजबाबदार कारभार जबाबदार आहे.

जिल्हाधिकारीर्‍यांनी मुक्कामाला यावे...

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे प्रशासनातील शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. नगर पालिका अथवा नगर पंचायत यांचे कामकाज पाहण्यासाठी त्या शहरात, गावात मुक्कामाला राहतात आणि भल्या पहाटे शहरात फेरफटका मारतात. कोरोना काळात ते श्रीरामपूर मुक्कामाला होते, परंतु पालिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना ज्या ठिकाणी कचरा, घाण, अस्वच्छता, रस्त्यावरील खड्डे, कालव्याची झालेली कचराकुंडी आहे, असे ठिकाण दाखवले नाही, परंतु शहरातील काही पत्रकारांनी ही वस्तुस्थिती जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली, तेव्हा हे ठिकाण सुद्धा पाहू, अशी सावरासावर पालिकेच्या अधिकार्‍याने केली होती. आता पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी एक दिवस श्रीरामपूरला मुक्कामी येण्याची आवश्यकता आहे. या निमीत्ताने पालिकेच्या कामकाजासह रस्ते, अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तुंबलेल्या गटारी, कालव्याची झालेली कचराकुंडी आणि गटार आदी पाहता येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com