श्रीरामपुरात विजेचा खेळखंडोबा

पाण्याचे नियोजन कोलमडले; महावितरण अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
श्रीरामपुरात विजेचा खेळखंडोबा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूरसह तालुक्यात सध्या विजेचा खेळखंडोबा झालेला आहे. वीज अचानक कधीही जाते आणि कधीही येते. यामुळे शहरातील पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजनही कोलमडले आहे. विज कशामुळे गेली? का गेली? अशी चौकशी करण्याकरिता फोन केला असता कोणीही धड उत्तर दिले जात नाही. महावितरणच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले असून कर्मचारी मनमानी पध्दतीने आपले कामकाज करत आहेत. त्यामुळे या सगळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यासह शहरात वीज कधीही येते आणि कधीही जाते. या अचानक वीज जाण्याचे सगळ्याच विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया लांबणीवर पडत आहेत. तर काही शस्त्रक्रिया रद्द करावे लागत आहेत. अतिदक्षता विभागातही रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. महावितरणचे अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. महावितरणकडे काही साहित्य खराब झाले तर ते मागितले असता ते ग्राहकांना विकत आणावयास सांगितले जाते. वीज बिलात अनेक प्रकारचे कर लावले जातात. या कराच्या नावाखाली नागरिकांची लूट होत असतानाही नागरिकांना योग्य ती सेवा पुरवली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अन्य विभागात काम करणार्‍या विभागातील संगणक या विजेच्या ये-जा मुळे खराब होत आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

या विजेच्या खेळखंडोबामुळे पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. प्रत्येक भागातील विजेचे वेळापत्रकही बदलले असल्याने पिण्याचे पाणी काही ठिकाणी मिळते तर काही ठिकाणी मिळत्त नाही. त्यामुळे पाण्याचे हाल होत आहेत.

सध्या उन्हाळ्याचा तडाखा जोरात असल्यामुळे लोकांची लाहीलाही होत असते. त्यामुळे लोकांना नेहमीच विजेची सवय झालेली आहे. थोडावेळ वीज गेली तर लोकांचे उकाड्यामुळे खूप हाल होत असतात. त्यामुळे वीज गायब झाली तर सध्या वीज का जाते? कधी येणार अशा शंका व तक्रार विचारण्यासाठी दुरध्वनी करुन विचारणा अधिकार्‍यांकडे किंवा कर्मचार्‍यांकडे केली असता थातुरमातुर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com