माजी सैनिकाच्या जागेवर अतिक्रमण करून मारहाण
सार्वमत

माजी सैनिकाच्या जागेवर अतिक्रमण करून मारहाण

आरोपीवर कारवाई होत नसल्याने 14 ऑगस्टपासून उपोषण

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहरात माजी सैनिकाच्या जागेवर अतिक्रमण करुन उलट त्यांनाच शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असताना पुढे प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे संतप्त झालेल्या माजी सैनिक कुटुंबियांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सैनिक बाळासाहेब कडनोर यांनी दिला आहे.

बाळासाहेब नामदेव कडनोर हे भारतीय सेनेत 17 वर्षे सेवेत होते. ते कारगिल युध्दात जखमीही झाले आहेत. सिध्दार्थ मागासवर्गीय सोसायटीत त्यांच्या मालकीचा प्लाट असून त्यात त्यांचे 900 स्क्वे फूट बांधकाम आहे. त्यांच्या शेजारी राहणार्‍या व्यक्तीने कडनोर यांच्या जागेत बांधकाम केले. पार्किगची भिंत तोडून स्वतःची गाडी उभी करत असतात.

तसेच कडनोर यांच्या कारच्या काचा फोडल्या. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांच्या जागेत लॉनही तयार केला. याची विचारणा करण्यास गेले असता शिवीगाळ करुन कडनोर यांना मारहाणही केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणीही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी म्हणून अप्पर पोलीस अधिक्षकांना निवेदनही दिले. तसेच पोर्टलवर तक्रारही दाखल करण्यात आली. माजी सैनिक कल्याण बोर्डच्यावतीनेही कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले. तरीही आपणास अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबियांससह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 14 ऑगस्ट 2020 पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कडनोर यांनी दिला आहे.

या माजी सैनिकाच्या समर्थनार्थ माजी सैनिक संघटना मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील, असा इशारा माजी सैनिक सेवा संस्था श्रीरामपूर, त्रिदल सैनिक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य, परिवर्तन फौंडेशनचे सेक्रेटरी मेजर कृष्णा सरदार, परिवर्तनचे अध्यक्ष उत्तमराव दाभाडे, एकलव्य सेवा संघाचे अध्यक्ष भाऊराव माळी यांनी दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com