श्रीरामपूर : पाईपमध्ये अडकले मृत जनावर

पालिकेच्या दुर्लक्षामुळे श्रीरामपूरच्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी
श्रीरामपूर नगरपरिषद
श्रीरामपूर नगरपरिषद

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या साठवण तलावाच्या गोंधवणी पुलाजवळील पाईप लाईनमध्ये एक मेलेली गाय अडकल्याने दुर्गंधी सुटली. हे सर्व दूषित पाणी तलावात गेले. पालिकेच्या दुर्लक्षामुळे श्रीरामपूरच्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त असे घाण पाणी पिण्याची वेळ आली आहे.

जवळपासच्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. परंतू सुस्त झालेल्या पाणीपुरवठा विभागाने त्या नागरिकांची दखलसुद्धा घेतली नाही. शेवटी नाईलाजाने काही नागरिकांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी आरोग्य खात्याचे लोक तिथे पाठवून पाईपलाईनमध्ये अडकलेली मृत गाय अक्षरश: ओढून काढली. साठवण तलावामध्ये पाणी घेण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी तलावात मेलेली माणसे देखील सापडलेली आहेत. ज्यावेळी साठवण तलावामध्ये कालव्यातून पाणी सोडले जाते, त्यावेळी कालव्याच्या तोंडाजवळ वॉचमन बसवून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण जाणार नाही याची काळजी घेत, जाळी लावून पूर्वी पाणी तलावात सोडले जात होते. मात्र गेली दोन वर्ष पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षाने दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा अभियंता ईश्‍वरकुट्टी यांचे आपल्या कर्मचार्‍यांवर नियंत्रण नसल्याने शहरातील अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज होऊन नळावाटे दूषित आणि घाण पाणी लोकांच्या नळांना येत आहे. ही बाब नित्याची झाली आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांनी परस्पर पाईपलाईनवर खाजगीरित्या नळ कनेक्शन जोडलेले आहेत. काहीनी खालून छिद्रे पाडलेली आहे. त्यामुळे पाईप लाईन मधील घाण सुद्धा पाण्यात येत आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या बेबंदशाहीमुळे गेली वर्षभर शहरातील पाण्याची चव बदलली आहे, आणि आता तर तलावांमध्ये मृत जनावरे आणि मृत माणसे वाहून यायला लागल्याने असे दूषित पाणी शहरवासीयांना प्यावे लागत आहे. शहराच्या अनेक भागात पाईप लाईन जुन्या झाल्या आहेत. त्या बदलण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पूर्वी कालव्यातून पाणी सोडले असताना दोन्ही ठिकाणी नगरपालिकेचे वॉचमन थांबत होते आणि पाण्यामध्ये येणारा कचरा, घाण बाजूला करून स्वच्छ पाणी तलावात सोडले जात होते. मात्र अलीकडे नगरपालिकेची अशी कोणतीही यंत्रणा पाणी तलावात पाणी सोडताना दिसून येत नाही. गाईसारखे मोठे जनावर पाईपलाईनमध्ये अडकलेच कसे? असा प्रश्‍न नागरिकांनी विचारला आहे. तसेच पाण्यामध्ये मेलेली गाय कोणी टाकली? ती कुठून वाहून आली? नॉर्दन ब्रांच पासून गोंधवणी पुलापर्यंत किमान तलावामध्ये पाणी घेताना तरी पालिकेने आपली सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. परंतू पाणी पुरवठा विभागावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

सत्ताधारी गटाचे नगरसेवक सुद्धा याप्रश्‍नी गप्प आहेत. त्यांनी त्यासाठी या नगरसेवकांनी तरी नगराध्यक्षांना साथ द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याने सत्ताधारी किंवा विरोधी नगरसेवक एकमेकाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत आता सर्व नव्या लोकांना संधी देऊन शहराची विस्कटलेली घडी बसवावी लागेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नगरपालिका पाणीपुरवठा विभागातील कार्यालयातील दोन कर्मचारी कार्यालयीन वेळेतसुद्धा मद्यप्राशन करून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडे काम घेऊन जाणार्‍यांना त्याचा वास सहन करावा लागतो. पाणीपुरवठा अभियंता ईश्‍वरकुट्टी हे परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याने श्रीरामपूरसारख्या मोठ्या शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपण आला आहे. त्यासाठी त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com