अल्पवयीन मुलीचे अपहरण, धर्मांतर, निकाह करून अत्याचार

तरूणाविरूध्द गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीचे अपहरण, धर्मांतर, निकाह करून अत्याचार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अल्पवयीन विद्यार्थीनीला शाळेतून पळवून नेत तिचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला व बळजबरीने निकाहही केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय 35, रा. वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इम्रान कुरेशी हा विवाहित आहे. या घटनेने परिसरासह शहरातील पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

शहराच्या परिसरातील एक 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी हिंदू मागासवर्गीय समाजाची आहे हे माहीत असताना देखील इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर (रा. वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याने तिचे शाळेतून अपहरण केले व जबरदस्तीने उचलून नेवून धर्मपरिवर्तन करून तिच्यासोबत निकाह केला. तसेच इमरान कुरेशी याने वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध केल्यामुळे ही अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाली. तरीही त्याने धमकी देऊन बळजबरीने तिच्यावर अत्याचार करीत राहिला. अशी फिर्याद पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरुन इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्या विरुद्ध अपहरण, बलात्कारासह, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम व ट्रॉसिटी कायद्यातील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक़ मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने अटक केली. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके हे स्वतः पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com